नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचे समजते. जागावाटपाच्या अंतिम टप्प्यामध्ये अजित पवार वेगळे झाले तर भाजप व शिंदे गटाला अधिकाधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखली जात असल्याचा दावा सूत्रांनी केला.

‘महायुती’मध्ये भाजप व शिवसेनेचा शिंदे गट विरुद्ध अजित पवार यांचा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ असा अंतर्गत सामना रंगला असून मतभेद तीव्र होऊ लागले आहेत. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड व भाजपचे राज्यसभेतील खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भाजप आमदार नितेश राणे यांनी अलीकडेच मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यांवरही अजित पवार आणि सुनील तटकरेंनी जाहीर आक्षेप नोंदविला व थेट दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. मात्र महायुतीमध्ये अजित पवार गटाची कोंडी करण्यासाठी ही रणनीती अप्रत्यक्षपणे वापरली जात असल्याचे मानले जात आहे. भाजप व शिंदे गटाचा काँग्रेसविरोधी तसेच कट्टर हिंदुत्ववादी पवित्रा अजित पवारांना मान्य नसेल तर त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असेल, असा संदेश या निमित्ताने दिला जात असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा >>>PM Modi US Visit : “नियतीने मला राजकारणात आणलं”, अमेरिकेतील भारतीयांशी संवाद साधताना मोदींचं विधान

महायुतीत राहिल्यास कमीत कमी जागा घेऊन अजित पवारांना निवडणूक लढवावी लागेल. ही तडजोड स्वीकारायची नसेल तर वेगळे होऊन लढण्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे जागावाटपातील अपेक्षाभंगाचे कारण देत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणे भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर पडणार असल्याने अजित पवारांची कोंडी करण्याचे प्रयत्न होत असल्याचे मानले जाते. महायुतीतून बाहेर पडल्यास अजित पवार गटाला अपेक्षित असलेल्या सुमारे ६० जागांवर उमेदवार उभे करता येतील. काही जागांवर महाविकास आघाडी, अजित पवार गट व भाजप-शिंदे गट असा तिहेरी सामनाही होऊ शकतो. सध्या अजित पवार गटाकडे सुमारे चाळीस आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये १०-१५ आमदार जरी जिंकून आले तरी अजित पवारांचे महत्त्व युती आणि आघाडी या दोन्हीसाठी वाढू शकते. त्यामुळे निवडणुकीनंतर राजकीय ताकद वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन अजित पवारांकडून अखेरचा पर्याय म्हणून विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा दावा सूत्रांनी केला.