पीटीआय, काठमांडू
नेपाळच्या दुर्गम डोंगराळ भागात शुक्रवारी झालेल्या भूकंपात जीवित आणि वित्तहानीनंतर नेपाळ प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. या भूकंपात आतापर्यंत १५७ जण मृत्युमुखी पडले आहेत. मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री आधी काठमांडूच्या पश्चिमेला ५०० किलोमीटरवर असलेल्या जाजरकोट जिल्ह्यात ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा केंद्रिबदू होता.
जाजरकोट आणि रुकुम पश्चिम जिल्ह्यांत भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. परंतु जाजरकोटमध्ये एका पालिका क्षेत्रात मात्र या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ‘काठमांडू पोस्ट’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बारेकोट ग्रामीण नगरपालिका हद्दीत घरे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु सुदैवाने तेथे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. या नगरपालिकेचे अध्यक्ष बीर बहादूर गिरी यांनी सांगितले, की जेव्हा येथील घरांचे झालेले नुकसान पाहिल्यानंतर येथे सुदैवाने कुणीही आपला जीव गमावला नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. ही देवभूमी आहे आणि देवानेच आपले रक्षण केल्याची अनेकची श्रद्धा आहे. सुमारे साडेतीन हजार घरे असलेल्या या ग्रामीण भागात पाच जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. येथे भूकंपामुळे अजिबात नुकसान न झालेले घर क्वचितच असेल. किमान ९० टक्के घरे नव्याने बांधण्याचीच गरज आहे. सुमारे हजारांवर घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील रहिवासी सध्या उघडय़ावर राहत आहेत.
हेही वाचा >>>सरकारी कर्मचारी असलेल्या महिलेचा चाकू भोसकून खून, घटनेनं एकच खळबळ
बारेकोट पालिका हद्दीत जीवितहानी झाला नसल्याच्या वृत्तास जाजरकोट जिल्हा प्रशासानाने दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी रविवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यात त्यांनी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये रोख देण्याचा निर्णय घेतला. नेपाळ सरकारने भूकंपात जखमी झालेल्या लोकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला.