स्पेक्ट्रमच्या दुसऱ्या टप्प्यातील लिलावाबाबत अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिगटाची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी होणार आहे. या बैठकीत चालू आर्थिक वर्षांसाठी स्पेक्ट्रम लिलावाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सीडीएमए सेवांसाठी वापरण्यात येणाऱ्या ८०० मेगाहर्ट्झ क्षमतेच्या स्पेक्ट्रम विक्रीबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
३ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत १८००/९०० मेगाहर्ट्झ क्षमतेच्या स्पेक्ट्रम विक्रीबाबत चर्चा झाली होती. मात्र लिलाव सुरू करण्याबाबतच्या तारखेबाबत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे स्पेक्ट्रम लिलाव येत्या आर्थिक वर्षांतच होईल, मात्र १८ जानेवारीपूर्वी हा निर्णय होणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
ज्या कंपन्यांचे परवाने सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत, त्यांनी नुकत्यात झालेल्या लिलावात स्पेक्ट्रमची  खरेदी केली असेल तर १८ जानेवारी २०१३ नंतरही ते आपली सेवा चालू ठेवू शकणार आहेत. दरम्यान, १८०० मेगाहर्ट्झ क्षमतेच्या ज्या स्पेक्ट्रमची विक्री झाली नव्हती, त्यांचा ११ मार्चपासून लिलाव सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या कंपन्यांचे २०१४ मध्ये परवाना नूतनीकरण होण्याचे शिल्लक आहे, त्यांच्याकडील ९०० मेगाहर्ट्झ क्षमतेच्या स्पेक्ट्रमचीही विक्री केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.