मोहम्मद मोर्सी यांना अध्यक्षपदावरून खाली खेचणारे लष्कर आणि मोर्सीसमर्थक यांच्यात सोमवारी झालेल्या धुमश्चक्रीय ४२ जण ठार तर ३२२ जण जखमी झाले. या घटनेनंतर मोर्सी यांचा पाठीराखा असलेल्या मुस्लिम ब्रदरहूड संघटनेने इजिप्तमधील हंगामी सरकारला मान्यता न देण्याचे आवाहन जागतिक समुदायाला केले आहे.
लोकक्षोभानंतर पदच्युत करण्यात आलेले मोर्सी सध्या लष्कराच्या ताब्यात आहेत. त्यांना लष्कराच्या येथील मुख्यालयात स्थानबद्ध करण्यात आले आहे. मोर्सी यांच्या समर्थकांनी लष्कराच्या मुख्यालयासमोरच ठिय्या देत आंदोलन सुरू ठेवले आहे. काही आंदोलकांनी सोमवारी मुख्यालयात शिरून मोर्सी यांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला.
आंदोलकांना रोखण्यासाठी लष्कराने केलेल्या गोळीबारात ४२ जण ठार तर ३२२ जण जखमी झाले. लष्कराने २०० आंदोलकांना अटकही केली आहे. या धुमश्चक्रीत लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला तर ४० जवान जखमी झाले. या घटनेनंतर लष्कराने एक प्रसिद्धिपत्रक जारी करत मोर्सीसमर्थकांवर आगपाखड केली. मात्र मुस्लिम ब्रदरहूडने त्याचा निषेध करत लष्कर खोटा प्रचार करत असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, या सर्व गदारोळानंतर मोर्सीसमर्थक मुस्लिम ब्रदरहूड संघटनेने लष्कराच्या पाठिंब्यावर उभारलेल्या हंगामी सरकारला मान्यता देऊ नये, असे आवाहन जागतिक समुदायाला केले आहे.
ब्रदरहूडचा राजकीय तोंडावळा असलेल्या फ्रीडम अँड जस्टीस पक्षाच्या कैरोतील कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. या कार्यालयातून शस्त्रास्त्रे आणि आक्षेपार्ह मजकूर असलेले साहित्य लष्कराला मिळाले होते. या घटनेने संतप्त झालेल्या मुस्लिम ब्रदरहूडने इजिप्तमधील क्रांती लष्कर दडपून टाकू पाहात असल्याचा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Egyptian forces fire at morsis supporters killing