Eid Al Fitr रमजान ईदच्या निमित्ताने नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना स्थळांवर गर्दी होते आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नमाज अदा करणाऱ्या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचा हा व्हिडीओ आहे. पोलिसांनी काही लोकांना थांबवल्यानंतर हा वाद सुरु झाला. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊ.

मुरादाबादमध्ये काय घडलं?

मुरादाबादमधील ईदगाह (प्रार्थनास्थळ) या ठिकाणी ईदची नमाज अदा करण्यासाठी लोक जमा झाले होते. त्यावेळी या ठिकाणी गर्दी झाली. ज्यानंतर पोलिसांनी काही लोकांना ईदगाहमध्ये जाण्यापासून रोखलं. यावेळी गर्दीतले लोक म्हणू लागले आम्ही नमाज अदा करायला आलो आहोत, वाद घालण्यासाठी नाही. पोलिसांनी लोकांना ईदगाहमध्ये जाण्यापासून रोखलं कारण मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती पण त्यावरुनच वाद सुरु झाला असं कळतं आहे. ANI ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या ठिकाणी चांगलाच तणाव निर्माण झाल्याचं पाहण्यास मिळालं. अनेकांनी नारे ए तंबीर अल्ला हो अकबर हे नारेही दिले. आता या ठिकाणी असलेली परिस्थिती नियंत्रणात आली आहे असं पोलिसांनी सांगतिलं आहे.

तरुणांचा आरोप काय?

मुरादाबाद येथील ईदगाहमध्ये वेळेत जाता आलं नाही म्हणून काही मुस्लिम तरुणांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी हा आरोप केला की सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी आम्हाला थांबवलं. आम्हाला वेळेत नमाज अदा करण्यासाठी जायचं होतं. आम्ही पोलिसांना हे सांगत होतो. पण त्यांनी आम्हाला दुसरीकडे जा असं सांगितलं. पोलिसांनीही ही बाब सांगितली. त्यानंतर शेवटी इमामांनी या सगळ्यांना बोलवलं आणि पुन्हा एकदा नमाज पठण करुन घेतलं. अशीही माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

मुरादाबादचे पोलीस अधीक्षक सतपाल अंतिल म्हणाले सगळ्या ठिकाणी शांततापूर्ण पद्धतीने नमाज पठण झालं. गेल्या सहा दिवसांपासून आजच्या दिवसासाठीची तयारी चालली होती. नमाज अदा केल्यानंतरही काही लोकांना ईदगाहमध्ये जाऊन नमाज अदा करायची होती. इमामाशी त्यांचं बोलणं झालं. त्यानंतर आता शांतते त्यांनी नमाज पठण केलं. सगळी परिस्थिती आता नियंत्रणात आहे असं अंतिल यांनी स्पष्ट केलं.

उत्तर प्रदेशातील इतर भागांमध्ये ईद उत्साहात साजरी

दरम्यान उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये शांततेत नमाज पठण झालं. तसंच रमजान ईदचा सणही उत्साहात आणि आनंदात साजरा होतो आहे. उत्तर प्रदेशातले ते व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशातील मुस्लिम बांधवांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. वाराणसी या ठिकाणी असलेल्या मशिदीतही मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.