पीटीआय, माले : मालदीवची राजधानी माले येथील एका गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत १० कामगारांचा मृत्यू झाला असून त्यात आठ भारतीयांचा समावेश आहे. उर्वरित दोन मृतांच्या राष्ट्रीयत्वाची माहिती अद्याप हाती आलेली नाही. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी रामधीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. निरुफेही भागातील मावेयो मशिदीजवळ एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या गॅरेजमध्ये स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १२.३० वाजता ही आग लागली. मृतांपैकी आठ जण भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे उच्चायुक्तालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. उच्चायुक्तालय स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून मृत भारतीयांच्या नातलगांना माहिती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २८ कामगारांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
गॅरेजमध्ये आणि पहिल्या मजल्यावरील निवासी भागात बरेच गॅस सिलिंडर ठेवले असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अचडणी आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तब्बल तीन तासांनंतर आग आटोक्यात आली. मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले. आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
काय घडले?
गॅरेजमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेतून आलेले ३८ कामगार कामाला होते. याच इमारतीत पहिल्या मजल्यावर त्यांचे निवासस्थान होते. ही जागा अत्यंत छोटी असून खोलीला एकच खिडकी होती, अशी माहिती आहे. प्रत्येक पलंगाच्या बाजुला गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते, अशीही माहिती आहे. चुकीच्या पद्धतीने गॅस कटर हाताळल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.