देशात करोनाचा फैलाव वाढू लागल्याने रुग्ण शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी गेल्या चोवीस तासांमध्ये आठ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या असून आतापर्यंत एकूण ६६ हजार चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

देशात करोनाबाधितांची संख्या अडीच हजारांच्या आसपास आहे. त्यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि त्यापाठोपाठ तमिळनाडूत आढळून आले आहेत. एकूण १५६ रुग्ण बरे झाले आहेत. टाळेबंदीच्या काळात करोनाबाधितांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झालेली नाही. मात्र, निझामुद्दीन मरकजमधून परतलेल्या तबलिगी जमातच्या मोठय़ा संख्येतील अनुयायांना करोनाची लागण झाल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसते, असे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

चाचण्यांच्या पद्धतीत बदल नाही

भारतात करोनाच्या नमुना चाचण्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याच्या मुद्दय़ावर अगरवाल म्हणाले की, चाचण्यांच्या पद्धतीमध्ये बदल केला जाणार नाही. करोनाबाधित केंद्रिभूत ठिकाणे शोधून काढली जात आहेत. त्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून तेथील संशयित रुग्णांची चाचणी केली जात आहे. नमुना चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या साधनांची (मेडिकल किट्स) कमतरता असून, त्याचा वापर गरजेनुसारच केला जाईल, असे स्पष्टीकरण अगरवाल यांनी दिले.

कारवाईचे आदेश

करोनाचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणी चाचणी करण्यासाठी गेलेल्यांवर हल्ला केल्याची घटना इंदूरमध्ये गुरुवारी झाली. त्याची दखल केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली आहे. अशा कार्यकर्त्यां, परिचारिका, डॉक्टर यांच्या सुरक्षेला धोका पोहोचत असेल तर त्या विरोधात राज्यांनी कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले .

आरोग्य सेतू अ‍ॅप

करोनासंबंधित आरोग्य सेतू हे नवे अ‍ॅप लोकांनी वापरावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याची सूचना हा अ‍ॅप देतो. या अ‍ॅपवर करोनासंदर्भातील माहितीही मिळते.

जलद चाचण्यांसाठी आज मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली : करोनाचा संसर्ग वेगाने वाढल्याने जलद प्रतिद्रव्य नमुना चाचणी घेण्यासंदर्भात शनिवारी केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) डॉ. मनोज मुहेकर यांनी दिली. वास्तविक, त्यावर उच्चाधिकार गटाच्या बठकीत शुक्रवारी निर्णय होणे अपेक्षित होते मात्र, शनिवारी यासंदर्भात मार्गदर्शक आदेश जारी केले जातील. ही चाचणी अवघ्या पाच मिनिटांत होत असल्याने करोनाच्या केंद्रीभूत ठिकाणांमध्ये ही चाचणी घेण्यावर भर दिला जाणार आहे. ही चाचणी कशी व कुठे घ्यायची यासंदर्भात ही मार्गदर्शक तत्त्वे असतील, असे डॉ. मुहेकर यांनी सांगितले.

चौदा राज्यांत ६४७ तबलिग अनुयायी करोनाबाधित

निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनुयायांमधील  बाधितांची संख्या गेल्या दोन दिवसांमध्ये ६४७ झाली आहे.

* देशातील एकूण करोनाबाधितांपकी ही संख्या २८ टक्के आहे. तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला नऊ हजार अनुयायी उपस्थित होते. ते विविध राज्यांमध्ये परतले.

* तमिळनाडूमध्ये ही संख्या सर्वाधिक म्हणजे ३६३ असून दिल्लीमध्ये करोनाबाधित अनुयायी २५९ तर उत्तर प्रदेशमध्ये ४२ आहेत.

* तेलंगण, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पुडुचेरी, अंदमान आदी ठिकाणीही करोनाबाधिक तबलिग अनुयायी सापडले आहेत.

* तबलिगी जमातच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या १३२० परदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात ‘रासुका’नुसार कारवाई

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई करण्यात येणार असल्याचे शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केले. तसेच गाझियाबादमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या तबलिगी जमातच्या रुग्णांवरही या कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले.

‘मेयो’तील करोना चाचणी यंत्रात बिघाड

नागपूर : मेयोमधील करोनाच्या नमुन्यांची तपासणी करणाऱ्या यंत्रात बिघाड झाल्याने आजपासून तपासणीचे काम एम्स रुग्णालयात करण्यात येणार आहे. आयसीएमआरने एम्सला यासाठी तातडीची बाब म्हणून परवानगी दिली आहे. मेयोच्या तुलनेत एम्समधील यंत्राची तपासणी क्षमता अधिक आहे. करोना संशयितांचे नमुने मेयोतील प्रयोगशाळेत तपासले जातात. मात्र शुक्रवारी तेथील यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने नागपुरातील मरकज संशयितांसह इतरही २०० नमुने तपासण्या खोळंबल्या होत्या. याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन तपासणीचे काम एम्सकडे दिले आहे. येथील नमुने तपासणी यंत्राची क्षमता रोज सरासरी १५० एवढी आहे.

Story img Loader