Bilawal Bhutto warns India amid Indus Waters Treaty suspension : जम्मू काश्मीरच्या पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केल्यानंतर आता भारतातील केंद्र सरकारने पाकिस्तानला सज्जड इशारा दिलाय. सिंधू नदी जल करार रद्द करण्यापासून पाकिस्तानी नागरिकांना भारतातून हकलून लावण्यापर्यंतचे अनेक आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. मोदींच्या या आक्रमक पावित्र्यानंतर पाकिस्तानकडूनही तितकेच आक्रमक प्रत्युत्तर आले. पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी यांनी सिंधू नदीवरून भारताविरोधात केलेल्या विधानावर आता केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बिलावल भुट्टे झरदारी काय म्हणाले?

सिंध प्रांतातील सुक्कुर येथे एका जाहीर सभेत भुट्टो-झरदारी म्हणाले होते की, “सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर या नदीतून आमचं पाणी त्यातून वाहील किंवा त्यांचं रक्त वाहील.” त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा झाली. जगभरातील माध्यमांनी याची दखल घेतली. आता भारतानेही या विधानाची दखल घेतली असून केंद्रीय मंत्री हरदीप पुरी सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हरदीप पुरी सिंग म्हणाले, “मी त्यांचं विधान ऐकलं. त्यांना कुठेतरी जाऊन उडी मारण्यास सांगा. पण पाणीच नसेल तर ते उडी कुठे मारतील? अशा विधानांना प्रतिष्ठा देऊ नका.”

“पहलगामची घटना ही स्पष्टपणे एका शेजारील राज्याने केलेला सीमापार दहशतवादी हल्ला आहे आणि ते जबाबदारी घेत आहेत. पूर्वीप्रमाणे, आता कोणताही व्यवसाय सुरू राहणार नाही. पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल आणि ही फक्त सुरुवात आहे. दहशतवादी जगण्याचा सर्वात मूलभूत अधिकार हिरावून घेतात. संपूर्ण जग याचा निषेध करत आहे”, असं ते पुढे म्हणाले.

पुरी यांनी लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील पाकिस्तानी लष्कर आणि हवाई सल्लागार कर्नल तैमूर राहात यांनी केलेल्या गळा चिरण्याच्या हावभावावरही भाष्य केले.

“हा राज्य पुरस्कृत दहशतवाद आहे. आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे त्यांना किंमत मोजावी लागेल. जर त्यांना (पाकिस्तानला) वाटत असेल की ते सिंधू पाणी कराराच्या निलंबनातून वाचू शकतील, तर मी त्यांना शुभेच्छा देतो,” असे ते म्हणाले.