एक बार फिरसे, रक्षा खडसे असा नारा रावेरकरांनी पुन्हा एकदा दिला आहे. आपल्याला ठाऊक आहे की रावेर लोकसभा मतदार संघातून एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे पुन्हा एकदा निवडणुकीला उभ्या आहेत. विविध विकास कामांचा दाखला देऊन रक्षाताई मतं मागत आहेत. २३ तारखेला असलेल्या मतदानाचा जोरदार प्रचार सुरू आहे. भुसावळ ते पंढरपूर एक्स्प्रेस असेल किंवा महिलांसाठी केलेल्या सोयी सुविधा असतील या सगळ्या कामांच्या जोरावर पुन्हा एकदा रक्षाताई मतांचा जोगवा मागत आहेत. आघाडीचे उल्हास पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे नितीन कांडेलकर अशी तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे. असं असलं तरीही रक्षाताईंना याचा फारसा फरक पडणार नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी रावेरमध्ये सभा आहे. या सभेसाठी माहोल असाच आहे की पुन्हा एकदा रक्षा खडसेच निवडून येणार. बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेस यांची फारशी टक्कर रक्षाताई खडसेंना नाही अशी चर्चा आहे. आता नेमकं काय होणार? रावेरकर पुन्हा एकदा रक्षाताईंनाच खासदार म्हणून निवडून देणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र रावेरमधील छोटे व्यापारी असोत, हॉटेल व्यावसायिक असोत किंवा अगदी रिक्षा चालवणारे चालक असो सगळ्यांनीच रक्षाताई खडसे निवडून येतील असं म्हटलं आहे. हा कौल लक्षात घेतला तर निवडणूक एकतर्फी होईल यात शंका नाही. मात्र जे लोक बोलत आहेत त्याचप्रमाणे मतांचं दान मतपेटीत टाकतील की नाही हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

एकंदरीत रावेर मतदारसंघाचा विचार केला असता प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने चांगलं आव्हान निर्माण केलं आहे. भुसावळमध्ये त्यांच्या सभेला झालेल्या गर्दीने हेच सांगितलं आहे. रावेरकर मात्र याच्या अगदी उलट मत मांडत आहेत त्यामुळे आता काय होणार हे मतदान किती टक्के होतं आणि नेमकं काय काय घडतं त्यावर ठरणार आहे. सध्या तरी एक बार फिरसे रक्षा खडसे असाच माहोल रावेरमध्ये आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse daughter in law contesting election from rawer