एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडून नाव आणि चिन्ह विकत घेतलं असलं तरीही त्या चिन्हावर आणि नावावर त्यांना मतं मिळणार नाहीत. जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना. भाजपाचं एक धोरण आहे वापरा आणि फेका ते त्यांनी सुरु केलं आहे. एकनाथ शिंदेंसह जे लोक गेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. मोदी अमित शाह यांचे फोटो लावून निवडणूक लढा आणि जिंकून दाखवा असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान दिलं आहे. तसंच एकनाथ शिंदे गट लाचार असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
मुंबई महापालिकेवर शिवसेना आणि भाजपा युतीचा झेंडा फडकणार असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत. कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेलो लोक लाचार आहेत. गुलामाला मालकाचीच भाषा बोलावी लागते. एकनाथ शिंदेंची मला कीव येते की ते कधीकाळी शिवसैनिक होते आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत होते. युतीमध्ये असतानापासून म्हणजे गेल्या ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर आहे. मुंबई बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात टिकवली. आता जे मिंधे आहेत ते म्हणत आहेत भाजपाचा महापौर म्हणजेच युतीचा. मुंबईत शिवसेनेचाच महापौर असला पाहिजे. पण मिंधेंच्या एकाही आमदार-खासदारात ही हिंमत, धमक नाही की ते अमित शाह किंवा नड्डांना सांगण्याची की भाजपाचा महापौर होणार नाही. भाजपाचा महापौर होणं म्हणजे शेठजींचा किंवा भांडवलदारांचा महापौर होणं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे त्या मानसिकेच्या लोकांचा महापौर. मुंबई महापालिका काबीज करण्याविरोधात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात सगळे एकवटलेच आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
लोकांच्या मनात संतापाची लाट आहे
उद्धव ठाकरेंबरोबरची सहानुभूतीची लाट वगैरे हे शब्द चांगले आहेत. पण जी काही झुंडशाही झाली. महाविकास आघाडीची सत्ता खेचली, उद्धव ठाकरेंना पद सोडावं लागलं ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही. लोकांच्या मनात संताप आहे त्या संतापाच्या लाटेत तुम्ही चिरडून जाल आणि आम्ही निवडून येऊ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काही वेळापूर्वीच त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आम्हाला लोकांचं ऐकण्यासाठी रेडिओची गरज नाही
आम्ही जनतेत आहोत, राजकारणात आहोत. लोकांची भावना आम्हाला समजते. लोकांच्या मनात काय आहे त्यासाठी आम्हाला रेडिओची गरज नाही. आम्ही लोकांमध्ये जातो आणि त्यांचं म्हणणं समजून घेतो. त्यामुळे लोकांच्या मनात चिड आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची झोप उडाली आहे. देवेंद्रजींचा चेहरा कायमच ओढलेला आणि तणावग्रस्त असतो. त्यांना झोप नाही, उद्याच्या भविष्याच्या चिंतेने त्यांना ग्रासलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. पहाटेपर्यंत जागून, रुपांतर करुन, वेश पालटून जाणं हे आता त्यांनी थांबवलं पाहिजे असाही खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. तसंच या सरकारवर अपात्रतेची तलवार कायम आहे असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.