राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या संसद भवनाबाबत गंभीर आरोप केले. “नव्या संसद भवनाच्या निर्मितीसारखा महत्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. मात्र, खासदारांना ते वर्तमानपत्रातून कळलं,” असा आरोप शरद पवारांनी केला. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शरद पवारांच्या या आरोपावर प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे संसद हा कुठल्याही एका पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही. संसद सार्वभौम आहे. हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. आज सर्वांना आनंद झाला पाहिजे आणि अभिमान वाटला पाहिजे की, मोदींनी २०१९ मध्ये याची संकल्पना मांडली आणि त्यांच्याच कार्यकाळात २०२३ मध्ये त्याचं उद्घाटन होत आहे.”
“इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याही हातून संसद भवनाचं उद्घाटन”
“संसद भवनाचं काम ऐतिहासिक आहे. प्रचंड वेगाने संसद भवनाची निर्मिती झाली आणि त्याचं लोकार्पण होत आहे. संपूर्ण देशातील जनता हे उद्घाटन पाहील. ही मोठी बाब आहे. यात सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. यात राजकारण आणता कामा नये. यापूर्वीही इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याही हातून संसद भवन, विधानभवन अशा इमारतींचं उद्घाटन झालं आहे. तेव्हाही राष्ट्रपती किंवा राज्यपालांना बोलावण्यात आलं नव्हतं,” असाही आरोप एकनाथ शिंदेंनी केला.
व्हिडीओ पाहा :
“त्या बैठकीला काही मुख्यमंत्री आले नाहीत”
निती आयोगाच्या बैठकीत गैरहजर मुख्यमंत्र्यांवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आज निती आयोगाच्या बैठकीत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्या बैठकीला काही मुख्यमंत्री आले नाहीत. ठीक आहे, त्यांच्या राज्यातील जनतेला लाभ मिळावा हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं नसेल. शेवटी हे त्यांच्या राज्याचं नुकसान आहे.”
“या बैठकीला १८-१९ मुख्यमंत्री होते”
“या बैठकीला १८-१९ मुख्यमंत्री होते. त्यांनी आपआपल्या राज्यातील विषय मांडले. आपल्या राज्याची भूमिका मांडली. त्यांना त्यांच्या राज्यात काय करायचं आहे आणि त्यात केंद्राची काय मदत पाहिजे यावर चर्चा केली. सर्व मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना पंतप्रधान मोदींनी अतिशय सकारात्मकपणे घेतलं आहे. त्यामुळे त्या राज्यांचा नक्कीच फायदा होईल,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
“संसद भवन बांधताना कुणालाही विश्वासात घेतलं नाही”
दरम्यान, शरद पवार म्हणाले होते, “अनेक वर्षापासून मी संसदेचा सदस्य आहे. संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचलं. असा महत्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. भूमिपूजन करतानाही कोणाला विश्वासात घेतलं नाही. आता इमारत तयार झाली आहे.”
हेही वाचा : “नव्या संसद भवनाची इमारत बांधताना कोणालाही…”, शरद पवारांचा मोदी सरकारवर आरोप
“संसदेची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते. पण, राष्ट्रपतींनी संसदेचं उद्घाटन करावं, हे सुद्धा मान्य करण्यात आलं नाही. त्यामुळे कोणाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं होतं.