नवी दिल्ली : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींबरोबर गुरुवारी रात्री उशिरा बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डादेखील उपस्थित होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी राजधानीत घडामोडींना वेग आला आहे.
महायुतीचा नवा मुख्यमंत्री व सत्तावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीसाठी शिंदे, फडणवीस व अजित पवार गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शहांच्या निवासस्थानी दाखल झाले, ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बैठकीआधी शिंदे, नड्डा आणि शहा यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली. त्यामुळे मुख्यमंत्रीपद सोडतानाच शिंदेंनी महत्त्वाची मंत्रिपदे पदरात पाडून घेण्याबाबत आग्रह धरल्याचे स्पष्ट झाले. श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान तसेच, शिंदे गटाला आणखी एक राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीत दाखल झाल्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास फडणवीस यांनी राज्याचे निवडणूक प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. त्यानंतर ते थेट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. फडणवीस यांनी अजित पवार, तटकरे व प्रफुल पटेल यांच्याशी तासभर चर्चा केली. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदी फडणवीसांच्या नावावर सहमती झाली असली तरी शिंदे गट महत्त्वाच्या खात्यांबाबत आग्रही आहे. ही रस्सीखेच तीव्र झाल्यामुळे फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी शहांच्या बैठकीआधी चर्चा केल्याचे सांगितले जाते. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीपूर्वी नड्डा व अमित शहा यांच्यामध्येही चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या नेत्याचे नाव निश्चित करण्याआधी विविध शक्यतांची पडताळणी केंद्रीय नेतृत्वाकडून केल्याचे सांगितले जाते. बुधवारी रात्री उशिरा भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंनीही शहांची भेट घेतली होती.
हेही वाचा >>>OTP Messages : १ डिसेंबरपासून OTP मेसेज मिळण्यास विलंब होणार? नेमकी कारणं काय? जाणून घ्या!
अजित पवार गुरुवारी सकाळीच दिल्लीत पोहोचले होते. त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिंदेंप्रमाणेच अजित पवारही केंद्रीत मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारमध्ये अजित पवार गटाला सध्या एकही मंत्रिपद देण्यात आलेले नाही. यावेळी प्रफुल पटेल यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. आपल्या पक्षाच्या खासदारांची बैठकीही ते घेणार होते. मात्र, दिल्लीत येण्यास उशीर झाल्याने श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आदी खासदारांनी शिंदेची विमानतळावरच भेट घेतली. शिंदेबरोबर शंभूराज देसाई व उदय सामंतही दिल्लीत आले.