लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून आता तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार सुरु झाला आहे. अशात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उद्धव ठाकरे हे काँग्रेसला मतदान करणार आहेत त्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे. बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार हे दुर्दैव आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेत म्हणत टीका केली आहे. तर उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले असं म्हणत शिंदे गटाच्या आणखी एका नेत्याने त्यांच्यावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे त्यांच्या सभांमधून कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसत आहेत. तसंच त्यांनी अबकी बार भाजपा तडीपार हा नाराही दिला आहे. याच टीकेवरुन रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही असंही म्हटलं आहे.
हे पण वाचा- “नरेंद्र मोदींमध्येच औरंगजेब संचारला आहे, कारण..”, संजय राऊत यांची बोचरी टीका
काय म्हणाले रामदास कदम?
“बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ लागली तर शिवसेना नावाचं दुकान मी बंद करेन. या बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेच्या विरोधात उद्धव ठाकरे काम करत आहेत. सोनिया गांधींचे पाय चाटत आहेत आणि देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत त्यांना लाज वाटत नाही का?, वडिलांचा विचार सोडून उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. मातोश्रीबाबत आम्हाला आदर होता. माँ आम्हाला आरती घेऊन ओवाळत असत. आज मातोश्रीवर काय चाललं आहे?” असा प्रश्न कदम यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरेंची लायकी आहे?-रामदास कदम
“उद्धव ठाकरे हे देशाच्या पंतप्रधानांबाबत बोलत आहेत. त्यांची लायकी काढत आहेत, मुळात यांची लायकी आहे का? संजय राऊत टिनपान माणूस आहे, काहीह बरळत असतो.” असंही कदम म्हणाले. तसंच ते पुढे म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही शिव्या देत आहात? ज्यांनी सांगितलं की देश हा माझा परिवार आहे. त्यांना तुम्ही बोलत आहात?” असे प्रश्न कदम यांनी उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे आमची खाती चालवत होता. माझ्याकडून सगळं शिकला आणि मला बाहेर काढलं. हा बाळासाहेब ठाकरेंचा नातू कसा काय? स्वतःच्या मुलासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम उद्दव ठाकरेंनी केलं असंही रामदास कदम म्हणाले.