‘येचुरी यांच्या निधनामुळे भारतातील डाव्या पक्षांतील एक महत्त्वाचा आवाज हरपला’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सीताराम येचुरी यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी येचुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा शिलेदार आज काळाच्या पडद्याआड गेला. डाव्या विचारसरणीची ही सर्वात मोठी हानी म्हणावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया पवार यांनी ‘एक्स’ या संकेतस्थळावरून व्यक्त केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणूस यांच्या हितासाठी आपले आयुष्य झोकून देणारा एक विचारवंत, तत्त्वनिष्ठ नेता देशाने गमावला,’ अशा शब्दांत येचुरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

येचुरी यांच्या पाच दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेकदा संघर्ष केला. मात्र आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. ते स्पष्टवक्ते आणि संयमी नेतृत्व होते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येचुरी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना समाजाच्या सर्व घटकांशी जवळीक असलेला नेता आपण गमावला, अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा >>> Sitaram Yechury Passes Away : किर्तीरुपी उरावे! सीताराम येचुरी यांच्या कुटुंबीयांचा मोठा निर्णय, संशोधनासाठी रुग्णालयाला देहदान!

रा.स्व.संघाकडून शोक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी येचुरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.‘येचुरी हे संवेदनशील आणि कार्यास वाहून घेतलेले राजकीय नेते होते. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो,’ असे त्यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.

उत्तम संसदपटू, सर्वपक्षीय मित्र गमावल्याबद्दल दु:ख

नवी दिल्ली : माकप सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त केले जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतरांनी येचुरी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.

आधी एक विद्यार्थी नेता म्हणून, त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात आणि एक संसदपटू म्हणून सीताराम येचुरी यांचा वेगळा आणि प्रभावी आवाज होता. आपल्या विचारसरणीशी कटिबद्ध राहून त्यांनी सर्व पक्षांतील लोकांशी मैत्री केली. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

येचुरी डाव्यांचे आघाडीचे मार्गदर्शक होते आणि सर्व पक्षीयांशी संवाद साधण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात. एक प्रभावी संसदपटू म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

येचुरी हे एक उत्कृष्ट संसदपटू आणि विलक्षण बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी व्यवहारवाद आणि आदर्शवादाची उत्तम सांगड घालून देशाच्या जनतेची सेवा केली. ते पुरोगामी विचारांचे विवेकरक्षक असल्याने त्यांच्या निधनामुळे उदारमतवादी गटांचे मोठे नुकसान झाले आहे.

– मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष

‘२००४ ते २००८ या काळापासून एकत्रित कार्य करत असताना सुरू झालेल्या आमच्या मैत्रीचा आज असा शेवट झाला. भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. देशाची विविधता जपण्यासाठी ते ठामपणे आग्रही राहिले. त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षतेचेही ते पुरस्कर्ते होते. – सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या

येचुरी माझे मित्र होते. त्यांना आपल्या देशाची उत्तम समज होती आणि ते भारत या संकल्पनेचे संरक्षक होते. त्यांच्याबरोबर आता दीर्घकाळ चर्चा रंगणार नाहीत. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा

येचुरी यांच्या निधनामुळे देशाचे आणि भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ते केवळ माकपसाठी नव्हे तर डाव्या आघाडीसाठी आणि भारतीय राजकारणासाठी मार्गदर्शक होते.

– पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

ते ज्येष्ठ संसदपटू होते. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रीय राजकारणाचे नुकसान झाले आहे.

ममता बॅनर्जी,

मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल ©

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde uddhav thackeray pay tribute to sitaram yechury zws