महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नेमका काय निर्णय होणार? यासंदर्भातल्या सुनावणीवर आज सकाळपर्यंत अनिश्चितता होती. अखेर हा विषय आजच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे या प्रकरणाची सुनावणी ५ सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २५ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? या मुद्द्यावर आज दुपारी ३ वाजता नियोजित असलेली सुनावणी देखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भातील पाच याचिकांचा समावेश सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती सी.टी. रवीकुमार यांच्या त्रिसदस्यीय पीठाच्या मंगळवारच्या दैनंदिन व पुरवणी कार्यसूचीत सोमवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीबाबतही रात्री उशिरापर्यंत अनिश्चितता होती. मात्र, आज सकाळी कपिल सिब्बल यांनी यासंदर्भातील याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी हा विषय कार्यसूचीमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास यावर सुनावणी घेण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांना बजावलेल्या आमदारांच्या नोटीसा, शिवसेना नेते सुभाष देसाई, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड आदी मुद्दय़ांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासंदर्भातील पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

“…तर हे सरकार अमान्य ठरू शकतं” सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विधान

न्यायालयाने आज कोणते आदेश दिले?

या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार, आता या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठासमोर घेतली जाणार आहे. येत्या २५ ऑगस्ट रोजी अर्थात ४८ तासांच्या आत ही सुनावणी घेतली जाणार आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असणाऱ्या धनुष्यबाणासंदर्भात निवडणूक आयोगासमोर नियोजित असणारी सुनावणी देखील दोन दिवसांनी पुढे ढकलली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर येत्या २५ ऑगस्ट रोजी सुनावणी आणि त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता आहे.

“न्यायालयाने शिंदे गटाची मागणी फेटाळली”

“सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातल्या घडामोडींवर सुनावणी झाली. शिवसेनेतून फुटून गेलेल्या गदारांच्या शिंदे गटानं असा दावा केला होता की विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घेऊ द्या. मात्र, कपिल सिब्बल यांनी आमच्या बाजूने प्रभावी मुद्दे मांडल्यानंतर यावर ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिंदे गटानं विधानसभेचे अध्यक्ष अपात्रतेसंदर्भातले निर्णय घेतील, ही मागणी केली होती. ती न्यायालयाने फेटाळली आहे”, अशी माहिती सुभाष देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde vs uddhav thackeray supreme court hearing handed over to larger bench pmw