Elderly couple suicide: संपत्तीसाठी जन्मदात्या आई-वडीलांचा अमानुष छळ केल्यामुळे वृद्ध दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. दाम्पत्यानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमधून त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराल वाचा फुटली. संपत्तीच्या हव्यासापोटी पोटच्या मुलांनीच आमच्यावर अत्याचार केला, अशी धक्कादायक माहिती दाम्पत्यानं चिठ्ठीत लिहिली. फक्त मुलंच नाही तर सुनांनीही आम्हाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आम्हाला उपाशी ठेवलं, हातात कटोरा घेऊन भीक मागायला जा, असं सांगितल्याचंही दाम्पत्यानं चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हजारीराम बिश्नोई (७०) आणि त्यांची पत्नी चावली देवी (६८) राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात राहत होते. करणी कॉलनीमधील त्यांच्या घरातील पाण्याच्या टाकीत दोघांचाही मृतदेह गुरुवारी (१० सप्टेंबर) आढळून आला. या वृद्ध दाम्पत्याला दोन मुलं आणि दोन मुली असे चार अपत्य आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी दाम्पत्यानं चिठ्ठी लिहिली, त्यात मुलगा राजेंद्र आणि सुनीलवर गंभीर आरोप केले आहेत. दोघांनीही संपत्तीच्या वादातून अनेकवेळा मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फक्त मुलंच नाही तर मुलींनीही आई-वडिलांना धमकावलं होतं. जर हा प्रकार बाहेर कुणाला सांगितला किंवा तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तर झोपेतच जीवे मारून टाकू, अशी धमकी देण्यात आल्याचे दाम्पत्यानं चिठ्ठीत लिहिले.

मुलगा राजेंद्र आणि त्याची पत्नी रोशनी, दुसरा मुलगा सुनील आणि त्याची पत्नी अनिता तसेच दोन मुली मंजू आणि सुनीता आणि काही नातेवाईकांची नावे चिठ्ठीत लिहून ठेवली आहेत. वृद्ध दाम्पत्याच्या नावावर असलेली सर्व संपत्ती मुलांना स्वतःच्या नावावर करून हवी होती. यासाठी त्यांचे काही नातेवाईक मुलांना मदत करत होते, असा आरोप चिठ्ठीत करण्यात आला आहे. मुलांसाठी बिश्नोई दाम्पत्यानं आधीच तीन प्लॉट त्यांच्या नावावर केले होते. तसेच त्यांची गाडी फसवणुकीने नावावर करून घेतली होती.

भीक मागण्यासाठी सांगितलं गेलं

बिश्नोई दाम्पत्यानं चिठ्ठीत लिहिलं की, आमच्याकडून सर्व काही घेऊन मुलं आणि त्यांच्या पत्नी आम्हाला उपाशी ठेवत होते. सुनीलने एकदा फोन करून सांगितलं की, कटोरा घ्या आणि भीक मागा. मी तुम्हाला जेवण देणार नाही. याची वाच्यता कुठे कराल तर मी तुम्हाला मारून टाकेन.

नागौरचे पोलीस अधीक्षक नारायण टोगस यांनी सांगितलं की, आम्हाला वृद्ध दाम्पत्य हरवल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार तपास केला असता पाण्याच्या टाकीत दोघांचा मृतदेह आढळून आला. फॉरेन्सिक पथकाला तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. तसेच घरातील सीसीटीव्हीचे चित्रण तपासले जात आहे. यादरम्यान घराच्या भिंतीवर सुसाईट नोट चिकटवल्याचे आढळून आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elderly couple dies by suicide in rajasthan alleging harassment by children kvg