Elderly couple who eloped 64 years ago get married Video : गुजरातमधे ६४ वर्षांपूर्वी समाजाची बंधने झुगारून पळून गेलेल्या जोडप्याचा खास लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तब्बल ६४ वर्षांनी या जोडप्याला त्यांच्या स्वप्नातील लग्नसोहळा अनुभवता आला आहे. या जोडप्याची मुले आणि नातवांडाच्या पुढाकाराने त्यांच्या स्वप्नातील लग्नसोहळा अगदी थाटात पार पडला असून या हृदयस्पर्शी लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ कल्चर गल्लीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हर्षद आणि म़णू अशी या दोघांची नावे आहेत. शालेय जीवनात हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण या दोघांची धार्मिक पार्श्वभूमी वेगवेगळी असल्याने १९६० च्या दशकात एकत्र येण्यासाठी त्यांना सामाजिक बंधने मोडीत काढावी लागली. या दोघांचे प्रेम शाळेत सुरू झाले. तेव्हा आतासारखं मोबाइल फोन किंवा इंटरनेट अस्तित्वात नव्हतं. तेव्हा हे दोघे हाताने लिहिलेली गुप्त पत्रे पाठवून त्यांच्या भावना व्यक्त करत.
घर सोडताना लिहीली चार शब्दांची चिठ्ठी
पण जेव्हा मृमूच्या कुटुंबियांना त्यांच्या नात्याबद्दल आणि हर्षदबरोबर लग्न करण्याच्या तिच्या इच्छेबद्दल माहिती झाले, तेव्हा त्यांना जोरदार विरोध झाला. त्या काळात प्रेम विवाह खूप कमी प्रमाणात होत असत आणि अशा विशेषतः आंतरधर्मीय विवाहांकडे संशयाने पाहिले जात असे. पण मृमू यांनी एक जीवनाला वेगळी कलाटणी देणारा निर्णय घेतला आणि एका मैत्रिणीकडे एका चिठ्ठीवर “मी परत येणार नाही” इतकाच संदेश लिहून देत घर सोडले. परंपरेला मागे टाकून त्यांनी प्रेमाची निवड केली. त्या हर्षदबरोबर पळून गेल्या आणि एक नवे आयुष्य सुरू केले.
१९६१ साली झालेलं त्यांचं लग्न अत्यंत कमी खर्चात पार पडलं. मृमू यांची लग्नातील साडी ही फक्त १० रुपयांची होती. कोणताही मोठा सोहळा करण्यात आला नाही, कोणत्याही जास्तीचे विधी झाले नाहीत आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा कुटुंबातील कोणीही नव्हतं. लग्नाला संमती नसताना आणि इतर अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी आयुष्य उभं केलं. त्यांनी त्यांचं नवीन कुटुंब घडवलं.
६४ वर्षांनंतर त्यांची मुले आणि नातवंडांनी त्यांच्या स्वप्नातलं लग्न सोहळा सत्यात उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डिझायनर कांकू थापा (Kankoo Thaapa) यांच्या मदतीने हा लग्न सोहळा अहमदाबाद येथे आयोजित केला. त्यांच्या या खास लग्न सोहळ्याचा व्हिडीओ कल्चर गलीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हर्ष आणि मृणू हे वेगवेगळे धर्म असलेले बालपणापासूनचे प्रियकर होते. १९६० च्या दशकात प्रेमविवाह समाजमान्य नसल्याने, त्यांचे कुटुंब त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. अखेर त्यांनी पळून जाऊन लग्न केले आणि एकत्र आयुष्य घलवले. आज त्यांच्या कुटुंबाने – त्यांच्या नातवंडांनी आणि मुलांनी मृणू आणि हर्षद यांनी नेहमी इच्छा बाळगली असेल अशा एका सुंदर सोहळ्यात त्यांचे लग्न एका लावून दिले.”
दरम्यान या हृदयस्पर्शी लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहेत. अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडीओच्या खाली या जोडप्याला शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये नेटकरी भरभरून आनंद व्यक्त करत आहेत.