देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत काही तरुण वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. एका तरुणाने त्या वृद्ध माणसाची दाढी कात्रीने कापली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. गाझियाबादच्या लोणी येथे ५ जून रोजी ही घटना घडली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पीडित अब्दुल समद सैफी बुलंदशहर येथील रहिवासी असून लोणी येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आपल्या धर्मामुळेच लक्ष्य केले असा आरोप त्यांनी केला आहे.

“आम्हाला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही माहिती मिळाली. ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि यापूर्वीच मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आम्ही परिसरातील स्थानिक रहिवाशांची विचारपूस करीत आहोत आणि इतरही पावले उचलली जातील, असे मंडळ अधिकारी लोनी अतुलकुमार सोनकर यांनी सांगितले. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सैफी यांना मारहाण करताना आणि दाढी कापण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमधील आरोपी गाझियाबाद येथील रहिवासी प्रवेश गुर्जर असे त्याचे नाव आहे.

त्यानंतर सैफी यांनी यासंदर्भात माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला होता. “मी ऑटोरिक्षाने जात होतो तेव्हा माझ्यासमोर बसलेल्या दोन व्यक्तींनी माझे अपहरण केले. ते मला घेऊन एका जंगलाच्या ठिकाणी गेले आणि मला मारहाण करण्यास सुरवात केली. मी त्यांना सोडण्याची विनंती करत राहिलो. त्यांनी मला वारंवार ‘जय श्री राम’ जप करण्यास सांगितले. त्यांनी माझ्या पाठीवर मारले आणि त्यांनी ‘जय श्री राम’ म्हणायला पाहिजे, असे म्हणायला सांगितले, ”असे सैफी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये सैफी यांनी आरोप केला आहे की या हल्ल्यात पाच जणांचा सहभाग होता. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीची पोलिसांनी ओळख पटविली आहे. व्हिडिओमध्ये असणाऱ्यांची चौकशी केली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader