Cyber Fraud: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे नाव वापरून सायबर चोरट्यांनी दिल्लीतील एका वृद्ध महिलेची फसवणूक केली आहे. दिल्लीतील ८२ वर्षीय राज शुक्ला यांचे पती हयात नाहीत. त्यांच्या पतीने राज शुक्ला यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी काही पैसे मागे ठेवले होते. तसेच शुक्ला यांनी उतारवयात घरखर्चासाठी काही बचत केली होती. अशी एकूण २५ लाख रुपयांची आयुष्यभराची कमाई सायबर चोरट्यांनी लंपास केली आहे. द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना शुक्ला यांनी हा सर्व घटनाक्रम सांगितला.
१० फेब्रुवारी रोजी शुक्ला यांना मुंबईहून एक फोन आला. पलीकडील व्यक्तीने तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित एका मनी लाँडरींग प्रकरणात तुमचे नाव आले आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले. “कुणीतरी तुमचे आधार कार्ड वापरून आयसीआयसीआय बँकेत खाते उघडले आणि त्यातून लाखो डॉलर्सचा व्यवहार केला. बेनामी कंपन्यांना हे पैसे पाठविण्यात आले”, असेही त्या व्यक्तीने शुक्ला यांना सांगितले.
त्यानंतर पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या एका माणसाला फोनवर घेतले. हा दुसरा व्यक्ती मुंबई पोलीस दलातील सहायक आयुक्त असल्याची बतावणी केली गेली. शुक्ला यांच्या नावाने उघडलेल्या बँक खात्यातून नवाब मलिक यांच्याशी संबंधित कथित मनी लाँडरींग प्रकरणातील कोट्यवधींची रक्कम वळती केली गेली आहे, असे त्याने सांगितले. यानंतर सायबर चोरट्यांनी शुक्ला यांच्या मोबाइलमध्ये स्कायपे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. या ॲपवर त्यांनी नवाब मलिक यांचा फोटो पाठवला आणि यांना ओळखता का? असा प्रश्न विचारला.
दोन्ही सायबर चोरट्यांनी शुक्ला यांना धमकावून त्यांच्या बँक खात्यातील २५ लाखांची रक्कम लंपास केली. दोन महिन्यानंतर आता या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
सायबर चोरट्यांनी केला मानसिक छळ
द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना शुक्ला यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी असलेल्या त्या दोघांनी मला चौकशीसाठी मुंबईला येण्यास सांगितले. माझे वय ८२ वर्ष असल्याने मी मुंबईला येऊ शकत नाही, असे म्हटले. त्यांनी मला काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठविण्यास सांगतिले, जेणेकरून मी या प्रकरणात सामील नसल्याचा पुरावा मिळेल. पण मी त्यासाठी नकार दिला.
त्यानंतर सायबर चोरट्यांनी पुढचे दोन दिवस वृद्ध शुक्ला यांना फोन करून त्रास दिला. तसेच त्यांचे म्हणणे ऐकले नाही तर मोठ्या मानहानीला सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली. १२ फेब्रुवारी रोजी राम प्रजापती नावाच्या एका व्यक्तीने शुक्ला यांना व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल केला. हा व्यक्ती पोलीस गणवेशात बसला होता. त्याने सांगितले की, तो आता त्यांच्या घरी येऊन त्यांना अटक करणार आहे. तसेच त्यांच्या शेजारीपाजारी राहणाऱ्या प्रत्येकाला कळेल की त्या घोटाळेबाज आहेत. या धमकीमुळे शुक्ला घाबरल्या.
घाबरलेल्या शुक्ला यांनी दुसऱ्या दिवशी मुलगा विवेक आणि सूनेबरोबर गाझियाबाद येथील बँकेच्या शाखेत जाऊन २२,५०,००० रुपयांची रक्कम चोरट्यांच्या खात्यात वळती केली. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा त्यांना फोन करून २५ लाखांची रक्कम मागितली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पैसे परत केले जातील, असा विश्वासही दिला. पण पैसेच उरले नसल्यामुळे त्यांनी पुढील पैसे पाठविण्यास नकार दिला.
१५ फेब्रुवारी रोजी शुक्ला यांनी मुलगी प्रतिभा हिच्यासह मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार सायबर पोलिसांकडे वळविण्यात आली. शुक्ला यांनी सांगितले की, त्यांचे पती दिल्ली उच्च न्यायालयात रजिस्ट्रार म्हणून काम करत होते. २०२१ रोजी त्यांचे निधन झाले. ही रक्कम माझ्या वैद्यकीय उपचारांसाठी जमवली होती. जर ही रक्कम परत मिळाली नाही तर माझे जगणे अवघड होईल.
दिल्ली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, अशी माहिती सायबर पोलिसांच्या सूत्रांनी दिली.