आज मतदान, प्रतिसादाबाबत साशंकता; आतापर्यंत अनंतनाग मतदारसंघात १२ टक्केच मतदान
केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांच्या वाहन ताफ्यावर पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांकडून झालेला हल्ला आणि त्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर यानंतर देशात संतप्त भावना उमटली. पुलवामा हा निवडणुकीचा मुद्दा झाला. त्यातून राष्ट्रवादाच्या भावनेवर भाजपकडून प्रचारात भर दिला जातो. प्रत्यक्ष पुलवामा गावात निवडणुकीचे अजिबात वातावरण नाही. येथे सोमवारी मतदान असले तरी प्रत्यक्ष किती मतदान होईल याबाबत साशंकताच आहे.
पुलवामा हे अनंतनाग मतदारसंघात येते. येथे दहशतवाद्यांचे प्राबल्य असल्यानेच या मतदारसंघात तीन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. आतापर्यंत फक्त १२ टक्के मतदान या मतदारसंघात झाले आहे. अनंतनाग मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती या निवडणूक लढवीत आहेत.
पुलवामा गावात पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन पक्षांची कार्यालये आहेत. दोन्ही पक्षांच्या कार्यालयांच्या सभोवताली कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. १४ फेब्रुवारीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर या गावातील सारेच चित्र बदलले. लष्कर आणि पोलीस दलाकडून सातत्याने गावाची झडती घेण्यात आली. मोठय़ा प्रमाणावर युवकांची धरपकड झाली. गावातील युवकांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून मारहाण करण्यात आली असा आरोप केला जातो. घरांची कधीही झडती घेतली जाते, अशीही तक्रार आहे. १९९० मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाने डोके वर काढले. तेव्हापेक्षा सध्याची परिस्थिती फारच वाईट असल्याचा अनुभव एक निवृत्त सरकारी कर्मचारी सांगत होते. निवडणूक जवळ आल्याने आसपासच्या परिसरातील ४०० पेक्षा अधिक युवकांची धरपकड करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात दंगेखोरीची पाश्र्वभूमी असलेल्यांना खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घ्यावेच लागते, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर बदललेली परिस्थिती आणि गावातील युवकांची झालेली धरपकड यामुळे मतदानाला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकताच आहे. गावातील युवकांना लष्कर आणि पोलिसांनी पकडून नेल्यास त्याचा मतदानावर साहजिकच परिणाम होणार. मतदानाला बाहेर पडा, असे सांगणार तरी कोणत्या तोंडाने, अशी व्यथा नॅशनल कॉन्फरन्सच्या स्थानिक कार्यकर्त्यांने बोलून दाखविली.