सोमवारी अमेठी, रायबरेलीसह ५१ जागांसाठी मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शनिवारी थंडावला. सोमवारी सात राज्यांमध्ये ५१ जागांसाठी मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील रायबरेली व अमेठी या मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून सप-बसप आणि राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने आपली सगळी प्रचारताकद पणाला लावली आहे.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रमुख नेत्यांच्या प्रचाराचे केंद्र हे उत्तर प्रदेश होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी येथे जोरदार प्रचार केला. काँग्रेस पक्षाबाबत सपाचे धोरण सौम्य असल्याचा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपा-बसप या विरोधी पक्षांच्या आघाडीमधील मतभेद दाखवून दिला. तर प्रियंका गांधी यांनी भाजप गावांमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करीत स्मृती इराणींवर जोरदार हल्ला चढविला.
भाजपसाठी महत्त्वाचा टप्पा..
समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीचे उत्तर प्रदेशात भाजपपुढे आव्हान आहे. त्यामुळे भाजपने प्रचारासाठी या टप्प्यात प्रचंड जोर लावला. अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात लढत आहे. अमेठी हा गांधी कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने सगळी ताकद लावली होती, तर प्रियंका यांनी राहुल यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठय़ा अपेक्षा आहेत, तर राजस्थान तसेच मध्य प्रदेशमध्ये सध्याच्या जागा टिकवण्याचे आव्हान आहे.
मला पाडण्याचे कारस्थान काँग्रेसकडून रचले जात असून त्यासाठी माझ्या बदनामीसाठी खोटा प्रचार केला जात आहे. मात्र माझी ५० वर्षांची तपस्या कुणीच धुळीला मिळवू शकत नाही. ५० वर्षे मी अविरतपणे देशासाठी झटलो आहे. तेव्हा मी स्वत:ही पडणार नाही आणि पक्षालाही पडू देणार नाही. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भाजप या वेळी निवडणूक हरणार आहे. मोदींना हे माहीत आहे की ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. त्या बिथरण्यातून त्यांच्याकडून काहीही वक्तव्ये होत आहेत. लष्कराच्या पराक्रमाचे श्रेय सध्या मोदी लाटत आहेत. जे काम लष्कराचे आहे त्यात मोदी यांनी दखल घेण्याचे कारण नाही; त्यापेक्षा त्यांनी युवक, शेतकरी, महिला यांच्यासाठी काय केले ते सांगावे. – राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष