मतदार यादीतून मतदारांची नावे मोठय़ा प्रमाणावर गायब असणे, यादीत नाव नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणे याबद्दल मतदारांच्या मनांत खदखदत असलेल्या असंतोषाची वाट मोकळी होताच, त्याबाबत शुक्रवारी निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांच्यावर सपशेल माफी मागण्याची वेळ आली. निवडणूक प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर त्रुटी असल्याचे मान्य करून ब्रह्मा यांनी मुंबई व महाराष्ट्रातील मतदारांची माफी मागितली.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही त्रुटी दूर करण्याच्या कामाला नव्याने सुरुवात करू, हे कसे घडले त्याचा शोध घेणेही गरजेचे आहे, इतक्या मोठय़ा प्रमाणावर त्रुटी असणे हा प्रकार यापूर्वी आपण कधीही पाहिला नाही, हा प्रकार अनाकलनीय आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात गुरुवारी अखेरच्या टप्प्यातील मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीपेक्षाही मतदार यादीतील गोंधळाची टक्केवारी अधिक असल्याचे स्पष्ट झाले. यादीतील घोळांमुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. प्रत्येकाला मतदान करता येईल, ही आमची जबाबदारी आहे, सगळ्यांची नावे मतदार यादीत येतील आणि त्यांना मतदान करता येईल, हे पाहणे ही आमचीच जबाबदारी होती, मात्र समन्वयाच्या अभावामुळे मोठय़ा प्रमाणावर त्रुटी राहिल्या, हे ब्रह्मा यांनी मान्य केले.
यादीतून नावे गायब असल्याची तक्रार मोठय़ा प्रमाणावर मुंबईकरांनी केली असून त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या आहेत. यापूर्वी पुण्यातही मतदारांची नावे यादीतून गायब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निष्पन्न झाले होते आणि त्याविरोधात नागरिकांनी जोरदार निदर्शनेही केली होती.
मुख्यमंत्र्यांची दिलगिरी
मतदार याद्या तयार करण्यात सरकारचा कसलाही सहभाग नसतो. तरीही मतदार याद्यांतील गोंधळामुळे राज्यातील जनतेला मतदान करता आले नाही याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी दिलगिरी व्यक्त केली. याद्या व्यवस्थित ठेवणे ही आयोगाची जबाबदारी असून वेबसाइटवर नाव असूनही प्रत्यक्ष यादीत नाव नसणे याला आयोगच जबाबदार असून निवडणुका संपल्यानंतर केंद्रीय आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही चव्हाण यांनी विधानभवनात पत्रकारांना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा