नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात झालेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना नोटीस बजावली. २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश यात देण्यात आले. मात्र मोदी व गांधी यांना थेट नोटीस बजावणे अपेक्षित असताना पक्षाध्यक्षांना नोटीस पाठवून आयोगाने बचावात्मक पवित्रा घेतल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानातील बांसवाडा येथील पंतप्रधानांच्या भाषणाविरोधात काँग्रेसने तर केरळच्या कोट्टायममधील राहुल गांधी यांच्या विधानांविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारींच्या आधारे आयोगाने गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दोन पानी नोटिसा पाठविल्या. विशेष म्हणजे या नोटिसांमध्ये मोदी किंवा गांधी या दोघांच्याही नावांचा उल्लेख केलेला नसून लेखी तक्रारींच्या प्रती जोडण्यात आल्या आहेत. प्रचारसभेतील भाषणांबद्दल प्रमुख प्रचारकच जबाबदार असतील असे नोटिसांमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रमुख प्रचारकांनी (मोदी व गांधी) प्रचारसभेमध्ये भाषणाचा दर्जा टिकवणे अपेक्षित आहे. आवेशपूर्ण भाषण करताना भाषणाची पातळी खालावू शकते. त्यामुळे दक्षता बाळगली पाहिजे, असे आयोगाने म्हटले आहे. एकाबाजूला आयोगाने आक्षेपार्ह भाषणांबद्दल नेत्यांना जबाबदार धरले असले तरी, ‘पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या आणि विशेषत: प्रमुख प्रचारकांच्या वर्तनाची जबाबदारी घ्यावी लागेल’, असेही म्हटले आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या अनुच्छेद ७७ नुसार, मोदी व गांधी यांचा त्यांच्या पक्षांनी प्रमुख प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. पक्षाने त्यांच्या भाषणांवर देखरेख ठेवणे अपेक्षित असल्याने पक्षप्रमुखांना नोटीस बजावण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

काही दिवसांपूर्वी भाजपचे पश्चिम बंगालमधील नेते दिलीप घोष यांनी ‘तृणमूल काँग्रेस’च्या सर्वेसर्वा व राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल तर, काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी भाजप उमेदवार हेमा मालिनी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. काँग्रेसच्या समाजमाध्यम विभाग प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांच्या ‘एक्स’ हॅण्डलवरून भाजपच्या हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातील उमेदवार व अभिनेत्री कंगना राणौत यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली गेली. या तीनही प्रकरणी आयोगाने थेट नेत्यांना नोटीस बजावली होती. मात्र, मोदी व गांधी यांच्या संदर्भातील फक्त पक्षाध्यक्षांना नोटिसा बजावण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोदी काय म्हणाले?

राजस्थानच्या बांसवाडामधील प्रचारसभेत मोदींनी, केंद्रात काँग्रेसला सत्ता मिळाली तर हिंदूंच्या संपत्तीचे फेरवाटप करून ती मुस्लिमांना दिली जाईल, असा दावा केला होता. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लीम लीगच्या विचारांची छाप असून देशाच्या विभाजनाची योजना आखली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याविरोधात काँग्रेसने तक्रार दाखल केली आहे. 

राहुल काय म्हणाले?

केरळमधील कोट्टयममधील प्रचारसभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘एक देश, एक भाषा, एक धर्म’ यासाठी मोदी प्रयत्नशील असल्याचे म्हटले होते. तसेच करेईबतूरमध्ये झालेल्या सभेत आपली भाषा, इतिहास व संस्कृतीवर पंतप्रधान हल्ला करीत असल्याचे विधान गांधी यांनी केले होते. त्यावरून उत्तर व दक्षिण भारतात दुही निर्माण करणारी भाषा राहुल करीत असल्याची तक्रार भाजपने केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission cautious stance on narendra modi rahul gandhi statements amy
Show comments