हिंदूंचे प्राबल्य असलेल्या वसाहतींमधून मुस्लिमांना हुसकावून लावावे, असे फर्मान विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी भावनगर येथे सोडल्यावरून गुजरात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला गेल्याचे एका वृत्त वाहिनीने रात्री उशिरा म्हटले असले तरी भावनगरचे पोलीस अधीक्षक मणिंदर सिंग पवार यांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल न झाल्याचे वृत्तसंस्थेला सांगितले आहे. तोगडिया यांच्या या वक्तव्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले असून निवडणूक आयोगानेही या भाषणाची चित्रफित मागविली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही या वक्तव्याविरोधात तीव्र सूर उमटला आहे.
हिंदूबहुल भागांत मुस्लिमांना घर अथवा मालमत्ता खरेदी करण्यापासून रोखावे, मुस्लिमांनी घर घेतले असल्यास ते रिकामे करण्यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत द्यावी आणि त्यानंतर जबरदस्तीने घरात घुसून ते घर रिक्त करावे, असे तारे तोगडिया यांनी तोडले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आम्ही चौकशी सुरू केली आहे. त्यातून पुरावे समोर आले तर तोगडिया यांच्याविरुद्ध समाजात तेढ निर्माण केल्यावरून १५३(अ) या कलमानुसार गुन्हा नोंदवला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
रालोआतील घटकपक्ष असलेल्या शिरोमणि अकाली दलाने अशा व्यक्तिला समाजात थारा मिळता कामा नये, असे नमूद केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र कोणताही स्वयंसेवक अशा फुटीर पद्धतीने विचार करीत नाही, असे म्हटले आहे. माकपने तोगडिया यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
भावनगरमधील मेघानी सर्कल परिसरात एका मुस्लीम उद्योजकाने एक वास्तू विकत घेतली असून त्या घरासमोर बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांसह निदर्शने करताना तोगडिया यांनी शनिवारी हा इशारा दिला. मालमत्तेच्या आंतर-समुदाय विक्रीस प्रतिबंध करणारा कायदा गुजरातमधील अनेक शहरांमध्ये लागू आहे, त्यामुळे येथेही त्याच कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करा, असेही या वेळी तोगडिया म्हणाले. राजकीय पक्षांवर दबाव टाकण्यासाठी निवडणुका ही योग्य वेळ असते, असेही सूचक विधान त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा