मतदारांना भुलवण्यासाठी सध्या विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते फेसबुक, ट्विटर, व्हाट्स अॅप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. निवडणूक काळात यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आचारसंहितेचा भंग होत असला तरी त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याचे सांगून निवडणूक आयोगाने हात टेकले आहेत. सोशल मीडियाच्या साहाय्याने मतदारांना भुलवणाऱ्यांचा तपास करणे कठीण आहे, कारण या तपासात खूपच पळवाटा आहेत, असे निवडणूक आयोगाने सोमवारी सांगितले.
‘‘निवडणूक आयोगाला सोशल मीडियावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. निवडणूक आयोग केवळ राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या ऑनलाइन अकाउंटवर लक्ष ठेवू शकतो. मात्र सोशल मीडियाचा तपास करण्यात खूपच पळवाटा आहेत. त्यांच्यावर आळा घालण्यासाठी ठोस यंत्रणेची गरज आहे,’’ असे मुख्य निवडणूक अधिकारी विजय देव यांनी सांगितले.
कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता वा कार्यकर्ता सोशल मीडियाच्या साहाय्याने मतदारांना विविध आमिषे दाखवत असेल आणि पक्षाचा गैरमार्गाने प्रचार करीत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवणे निवडणूक आयोगाला अशक्यच आहे, असे देव यांनी सांगितले. ‘‘सोशल मीडियावरील प्रचारांच्या बाबतीत आम्ही केवळ पंचाची भूमिका निभावू शकतो. त्याचा तपास मात्र करू शकत नाही. त्यावर कायदेशीर मार्गानेच कारवाई करावी लागेल,’’ असे देव यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission fail to control campaign through social media