पीटीआय, नवी दिल्ली

मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी १८ मार्चला केंद्रीय गृह सचिव आणि कायदा व न्याय मंत्रालयाचे सचिव यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये मतदार ओळखपत्रे आधारशी र्डाशी जोडण्याबद्दल चर्चा होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभरात मतदारयाद्यांमध्ये घोळ होत अल्याचे आरोप होत आहेत. विशेषत: लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने याविषयी आक्रमक भूमिका घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे.

निरनिराळ्या राज्यांमध्ये दुबार मतदार ओळखपत्रे आढळल्यानंतर, भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग मतदारयाद्यांमध्ये घोळ करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. लोकसभेतही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अशीच टीका केली होती. मात्र दुबार मतदार ओळखपत्र हा जुनाच मुद्दा आहे असे म्हणत त्यावर तीन महिन्यांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे. तसेच दुबार मतदार ओळखपत्र म्हणजे बनावट मतदार नव्हेत असाही दावा आयोगाने केला आहे. मतदार ओळखपत्र आणि आधारची जोडणीसाठी कोणतीही मुदत निश्चित करण्यात आलेली नाही असे केंद्र सरकारने संसदेत यापूर्वी सांगितले आहे. तसेच ओळखपत्र आधारशी जोडलेले नसेल तर असे नाव मतदारयादीतून वगळण्यात येणार नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

तृणमूल काँग्रेसची टीका

ही बैठक तात्पुरती मलमपट्टी असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. दुबार मतदार क्रमांक तसेच मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याबाबत जे स्पष्टीकरण आयोगाने यापूर्वी दिले आणि आताची बैठक पाहता बचाव करण्याचा प्रयत्न असल्याची टीका तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील उपनेत्या खासदार सागरिका घोष यांनी केली.

Story img Loader