Presidential Election Timetable : भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यानुसार, राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होईल. या निवडणुकीत यंदा एकूण ४,८०९ जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाहीये.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होईल आणि २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडेल.
राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम काय?
नोटिफिकेशन जारी – १५ जून २०२२
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – २९ जून २०२२
अर्ज छाननी – ३० जून २०२२
अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस – २ जुलै २०२२
मतदानाचा दिवस – १८ जुलै २०२२
मतमोजणी – २१ जुलै २०२२
एका खासदाराच्या मताची किंमत किती?
राष्ट्रपती निवडणुकीत एका खासदाराच्या मताची किंमत ७०० असणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खासदारांनाही मतदान करता येणार आहे. तुरुंगात असणारे खासदार पॅरोलसाठी अर्ज करू शकतात. त्यांना पॅरोल मंजूर झाल्यास त्यांना देखील या निवडणुकीत मतदान करता येणार आहे.
हेही वाचा : स्थलांतरित मतदार कुठूनही मतदान करू शकणार? निवडणूक आयोगाचा समिती स्थापन करण्याचा निर्णय
राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून कोणती भूमिका घेतली जाणार, निवडणूक बिनविरोध होणार की दोन्हीकडून उमेदवार घोषित होणार, कोणाच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आगामी काळातच मिळणार आहेत. सर्वांचेच या निवडणुकीवर लक्ष असणार आहे.