भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता राष्ट्रपती निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकारी दुपारी ३ वाजता विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या नवीन राष्ट्रपतींना २५ जुलैपर्यंत शपथ घ्यायची आहे. २०१७ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी झाली आणि २० जुलै रोजी मतमोजणी झाली होती.

घटनेच्या अनुच्छेद ६२ नुसार, पुढील राष्ट्रपती निवडण्यासाठीची निवडणूक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांव्यतिरिक्त, सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य, राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीच्या विधानसभेचे सदस्य मतदान करतात. राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभेच्या नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे राज्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यांनाही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार नाही.

विश्लेषण : राष्ट्रपतीपद निवडणुकीत मतांचे मूल्य कसे ठरते?

 राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ असते. राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० एवढी आहेत. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने महाविकास आघाडी पाठिंबा देईल त्या उमेदवाराला राज्यातून २८ हजारांच्या आसपास मते मि‌ळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतदार किती?
राष्ट्रपतीपदाकरिता खासदार आणि आमदार मतदान करतात. देशातील ७७६ खासदार (५४३ लोकसभा आणि २३३ राज्यसभा) आणि ४१२० आमदार अशा एकूण ४८९६ जणांना मतदानाचा अधिकार असतो. खासदारांच्या एका मताचे मूल्य हे ७०८ आहे. प्रत्येक राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारे आमदारांच्या मतांचे मूल्य हे वेगगेवळे असते. खासदारांची एकूण मते ही ५,४९,४०८ एवढी आहेत. आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ एवढी होतात. या निवडणुकीत एकूण मतांचे मूल्य हे १०,९८,९०३ एवढे आहे. पाच लाखांपेक्षा अधिक मते मिळवणारा निवडून येतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission of india to announce the schedule for election for the next president of india at 1500 hours today msr
Show comments