यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. कारण, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज रविवारी संध्याकाळी ५ वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.  सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होतील अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष लागले आहे.

 भारत-पाकिस्तानमध्ये तणाव असला तरी लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील असे निवडणूक आयोगाकडून एक मार्च रोजी स्पष्ट करण्यात आले. सर्व राजकीय पक्षांबरोबर चर्चा केली आहे. ईव्हीएम मशीनला लोकांनी फुटबॉल बनवल्याची खंत निवडणूक आयोगाने व्यक्त केली. युद्धाची स्थिती असल्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता व्यक्त होत होती. पण निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणूका ठरलेल्या वेळीच होतील हे स्पष्ट केले. एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान वेगवेगळया टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात.

या लोकसभा निवडणुकांच्या वेळी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अर्थात नमो VS रागा अशीच लढाई पाहण्यास मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला एकाही राज्यात सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे या निकालांमधून धडा घेत भाजपाने तयारी सुरु केली आहे. तर पाचपैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता असल्याने काँग्रेसचे कार्यकर्तेही जोशाने निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. आता लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार? जनता पुन्हा मोदींना कौल देणार की वेगळंच चित्र समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader