नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी पाच ते रात्री साडेअकरा या वेळेत वाढलेला मतांचा टक्का ही सामान्य बाब असून मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असे स्पष्टीकरण मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतांच्या वाढीव टक्क्याबाबत काँग्रेसने शंका घेतली होती. संध्याकाळी ५ ते ६ या एका तासात सुमारे ७६ लाख मतदान झाल्याचा दावा काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केला होता. तसेच, मतदार यादीत मतदारांची मोठ्या प्रमाणावर भर घालण्यात आल्याचाही आरोप केला होता. या दोन्ही मुद्द्यांचे आयोगाने मंगळवारी काँग्रेसला पाठवलेल्या पत्रामध्ये शंकानिरसन केले. संध्याकाळी ५ वाजता मतांचा टक्का ५८.२२ होता, तो रात्री ११.३० वाजता ६५.०२ टक्के झाला. आयोगाने घोषित केलेली मतांची अंतिम टक्केवारी ६६.०५ इतकी होती. हा वाढीव टक्का एकत्रित मतांची आकडेवारी असते, त्यामध्ये कोणतीही चूक वा गैरप्रकार झालेला नाही. प्रत्यक्षात झालेल्या मतदानाची टक्केवारी बदलणे अशक्य असते. प्रत्येक उमेदवाराच्या मतदान केंद्रावरील प्रतिनिधीला ‘१७-क’ अर्ज देणे बंधनकारक असते. मतदानाची प्रक्रिया थांबल्यानंतर मतदान केंद्रावरच मतांची आकडेवारी असलेला ‘१७-क’ हा अर्ज दिला जातो. ‘१७-क’मधील अर्जामध्ये नंतर कोणताही बदल केला जात नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> माजी गृहसचिव मणिपूरच्या राज्यपालपदी; आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे केरळऐवजी बिहारची जबाबदारी

‘व्होटर टर्नआऊट’ अॅपवर साडेपाच वाजता प्रसिद्ध करण्यात आलेली मतांची टक्केवारी त्यावेळी उपलब्ध झालेल्या माहितीवर आधारित असते. अनेकदा सर्व मतदान केंद्रांवरील आकडेवारी विविध कारणांमुळे तात्काळ उपलब्ध होत नाही. ती उशिरा पोहोचत असल्यामुळे रात्री साडेअकरा वाजता मतांची टक्केवारी वाढलेली दिसते, असा युक्तिवाद आयोगाने केला आहे.

प्रत्येक टप्प्यावर सर्व पक्षांचा सहभाग

मतदार यादीतून मतदारांची नावे मनमानी वा स्वैरपणे वगळली वा ती समाविष्ट केल्याचा आरोप आयोगाने फेटाळला. जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांमध्ये सुमारे ४७ लाख मतदारांची भर पडली. ५० मतदारसंघांमध्ये सरासरी ५० हजार नव्या मतदारांना सामील केले गेले व त्यातील ४७ मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला, असा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसची ही माहिती चुकीची असून फक्त ६ मतदारसंघांमध्ये एकूण ५० हजार मतदारांची भर पडली, असा दावा आयोगाने केला आहे. मतदान यादी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व राजकीय पक्षांना सहभागी करून घेतले जाते व ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी असल्याचेही आयोगाने नमूद केले आहे.

निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेतले जाते. घाऊक पद्धतीने मतदारांची नावे वगळण्यात आलेली नाहीत. प्रत्येक मतदारसंघात सरासरी २७७९ नावे वगळली. यात निधन, स्थलांतर किंवा दुबार मतदारांचा समावेश होता. – निवडणूक आयोग

आयोगाचे उत्तर

आकडेवारी उशीरा हाती आल्यामुळे वाढ

मतदार यादी अद्यायावत करण्याची काटेकोर प्रक्रिया

५० हजारांची भर केवळ सहा मतदारसंघांमध्ये

काँग्रेसचे आरोप

पाच ते ११.३० या वेळेत मतटक्का वाढला

यादीतून नावे स्वैरपणे वगळली अथवा समाविष्ट केली

५० मतदारसंघांत ५० हजार नवे मतदार

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission refues congress objections on voting process zws