निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर अखेर कारवाई केली आहे. आदर्श अचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी आयोगाने योगी आदित्यनाथ यांना ७२ तासांसाठी तर मायावती यांना ४८ तासांसाठी प्रचारबंदी केली आहे.

त्यामुळे योगी पुढचे तीन दिवस तर मायवती दोन दिवस आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करु शकणार नाहीत. उद्या सकाळी म्हणजे १६ एप्रिल सकाळी सहा वाजल्यापासून ही प्रचारबंदी अंमलात येणार आहे. भाषणाच्यावेळी दोन्ही नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

सात एप्रिल रोजी सहारनपूर देवबंद येथे सपा आणि बसपाच्या संयुक्त सभेत केलेल्या वक्तव्या प्रकरणी मायावतींवर ४८ तास प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली आहे. मायावती यांच्या भाषणाचा जो स्वर होता. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो असे निवडणूक आयोगाचे मत आहे. पुढचे ४८ तास मायावतींवर सभा, रोड शो आणि मुलाखती देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मागच्या आठवडयात मायावती यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. मतविभाजन टाळण्यासाठी मायावती यांनी मुस्लिम मतदारांना आवाहन केले होते.

मेरठ येथील सभेत आदित्यनाथ यांनी केलेल्या अली आणि बजरंग बली वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. योगीचे वक्तव्य चिथावणीखोर असल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला.

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ</strong>
काँग्रेस, सपा, बसपाचा ‘अली’वर विश्वास असेल तर भाजपाचा ‘बजरंग बली’वर विश्वास आहे असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. निवडणुकीत बजरंग बलीचे समर्थक आपल्याला सोडणार नाहीत हे त्यांना माहित आहे म्हणून काँग्रेस, सपा आणि बसपा अल्पसंख्यांकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस, सपा, बसपाचा अलीवर विश्वास असेल तर आमचा बजरंग बलीवर विश्वास आहे. बजरंग बलीचे समर्थक आपल्याला सोडणार नाहीत हे सपा, बसप आणि काँग्रेसला ठाऊक आहे म्हणून ते ‘अली, अली’ ओरडत आहेत असे योगी म्हणाले.