उत्तराखंडमधील विकासनगर विधानसभा निवडणुकी वेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर हे ईव्हीएम मशीन न्यायालयाच्या ताब्यात राहतील असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. काँग्रेसचे उमेदवार नव प्रभात यांनी भाजपच्या मुन्ना सिंह चौहान यांच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. निवडणुकीवेळी ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आल्याचा आरोप नव प्रभात यांनी केला होता.
सहा आठवड्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विकासनगर मतदारसंघातील ईव्हीएम पुन्हा दुसऱ्या कुठल्या निवडणुकांसाठी वापरू नका असे सांगण्यात आले आहे. उत्तराखंड निवडणूक झाल्यानंतर हे ईव्हीएम वापरण्यात आले नव्हते. निवडणूक झाल्यानंतर किमान दोन महिने ईव्हीएम वारता येत नाहीत असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. उत्तराखंड निवडणुकीमध्ये ११,००० ईव्हीएम वापरले गेले गहोते. त्या पैकी १३९ ईव्हीएम विकासनगर मतदारसंघासाठी वापरण्यात आले होते.
उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी ईव्हीएममध्ये घोळ झाला त्यामुळेच भाजपचे सरकार निवडून आले असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. ईव्हीएम ऐवजी बॅलेटपेपरने मतदान घेतले असते तर भाजप कधीच जिंकली नसती असे बसपच्या प्रमुख मायावतींनी म्हटले होते. या निवडणुकांचे निकाल रद्द करुन नव्याने निवडणुका घ्या असे त्यांनी म्हटले होते. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी देखील निवडणुकांच्या निकालावर नाराजी दर्शवली होती. ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आला त्यामुळेच आपण पंजाब निवडणुका हरल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करता येत नाही असे म्हटले होते. तुम्ही तुमच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करा. असे निवडणूक आयोगाने म्हटले होते.