लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. अगदी काही दिवसांवर ही निवडणूक आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या निवडणुकीत प्रचार करताना धर्म, जात, भाषेच्या आधारावर मतं मागू नयेत. तसेच देव आणि भक्त यांच्यातील नात्याचा अवमान होईल अशी विधाने करू नयेत, असे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना सांगितले आहे.
प्रार्थनास्थळांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपयोग करू नये
स्टार प्रचारक, पक्ष तसेच उमेदवार यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील निवडणूक आयोगाने दिलाय. मशीद, चर्च, गुरुद्वारा तसेच अन्य प्रार्थनास्थळांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपयोग करू नये, असेही निवडणूक आयोगानं सांगितलंय.
याआधी ज्या स्टार प्रचारक, उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटिशी मिळालेल्या आहेत, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशीही सूचना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिलीय.
विभाजनवादी प्रचार करू नये
निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणूक तसेच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकते. या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेच आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येक पक्ष, स्टार प्रचारक तसेच उमेदवार यांना करावे लागेल. याआधी निवडणूक आयोगाने वरील सूचना जारी केल्या आहेत. अलीकडेच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी प्रचारादरम्यान वैयक्तिक हल्ला करू नये, विभाजनवादी प्रचार करू नये, त्याऐवजी आदरयुक्त नैतिक आणि आदरयुक्त राजकीय प्रचाराला प्रोत्साहन दिले पाहिजे, असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय.
मतदारांची दिशाभूल करू नये
राजकीय पक्षांनी प्रचार करताना वेगवेगळ्या प्रश्नांना, समस्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार करावा. नेत्यांनी वस्तूनिष्ठ माहिती नसतानाही विधाने करू नयेत, मतदारांची दिशाभूल करू नये, असेही निवडणूक आयोगाने आपल्या सूचनांत म्हटलंय. समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रचार करताना अपमानकारक, वाईट, खालच्या स्तराच्या पोस्ट टाकू नयेत, असंही निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष, नेत्यांना सांगितलंय.