५० टक्के मतपावत्यांची मोजणी करण्याचा आग्रह
निवडणूक मतदान यंत्रांमधील बिघाड व गैरप्रकार याबाबत विरोधी पक्षांची रविवारी बैठक झाली. त्यात आताच्या निवडणुकीत पन्नास टक्के मतदान यंत्रांच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ांची (मतपावत्यांची) पडताळणी मतमोजणीवेळी करण्याची मागणी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेऊन निवडणूक यंत्रातील गैरप्रकार व त्यातील बिघाड हे मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले, की २१ राजकीय पक्षांनी मतमोजणीवेळी ५० टक्के यंत्रांच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी सांगितले की, विरोधी पक्षांनी याबाबत निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी करावेत यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मतदान यंत्रांच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ांची पडताळणी करण्यात यावी असा आदेश जारी करण्यात यावा याकरिता याचिका दाखल केली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील गैरप्रकारांबाबत विरोधी पक्ष देशव्यापी जनजागृती मोहीम राबवणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील बिघाड व गैरप्रकार या मुद्दय़ात निवडणूक आयोगाने गांभीर्याने काही केले आहे असे वाटत नाही, असा आरोप सिंघवी यांनी केला. पत्रकार परिषदेला तेलुगू देसम, समाजवादी पक्ष, भाकप, माकपचे प्रतिनिधी उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भाजपवर मतदान यंत्रात फेरफारीचा आरोप केला.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्रांची निवड करून तेथील व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ांची तपासणी करण्यात यावी, त्यामुळे विरोधी पक्षांचे समाधान होऊन मतदारही संतुष्ट राहतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते.
पराभवासाठी कारणे शोधण्याची धडपड -भाजपचा टोला
लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या दारुण पराभवासाठी कारण शोधण्याची विरोधकांची ही धडपड आहे अशी टीका भाजपने या बैठकीवर केली आहे. निवडणूक यंत्रांचे कारण घेऊन एकत्र आलेले बहुसंख्य पक्ष निवडणूक स्वतंत्रपणे लढत आहेत असा टोला भाजप प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिंहराव यांनी लगावला आहे. भाजपपुढे आव्हान उभे करण्यात या पक्षांना अपयश आलेच पण गेल्या वर्षांत दिलेली विरोधकांची जबाबदारीही त्यांना पार पाडता आली नाही, असा आरोप जीव्हीएल यांनी केला.