|| संतोष प्रधान
लोकसभा निवडणुकीत राज्यातील कौल बहुसंख्य वेळी एका पक्षाच्या किंवा आघाडीच्या बाजूने मिळाला आहे. गत वेळी हाच कल कायम होता. यंदाही एकाच विचारांच्या युती किंवा आघाडीला की संमिश्र यश मिळणार याबाबतउत्सुकता कायम आहे.
आतापर्यंत झालेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांपैकी महाराष्ट्रात ११ वेळा एकच पक्ष किंवा आघाडी अथवा युतीच्या बाजूने कौल मिळाला आहे. राष्ट्रीय पातळीवरील लाटेचे राज्यात पडसाद उमटतात. १९५१ ते १९७१च्या निवडणुकीपर्यंत राज्यात काँग्रेसचे वर्चस्व होते. आणीबाणीनंतर उत्तर भारत आणि मध्य भारतात काँग्रेसचे पार पानिपत झाले होते. पण महाराष्ट्रात तेव्हाही काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. १९८० आणि १९८४ मध्ये पुन्हा काँग्रेसच्या बाजूने महाराष्ट्र उभा राहिला होता. १९८९ मध्ये विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचे सरकार सत्तेत आले होते, तेव्हाही महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.
१९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युती सत्तारूढ झाली होती. त्यानंतर वर्षभरातच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ३३ जागा जिंकून युतीने काँग्रेसला पहिल्यांदाच धक्का दिला होता. काँग्रेसचे तेव्हा १५ खासदार निवडून आले होते. आणीबाणीनंतरही राज्यात काँग्रेसचे २० खासदार निवडून आले होते. युतीची सत्ता असताना १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, रिपब्लिकन आणि शेकापचे ३८ खासदार तर शिवसेना-भाजप युतीचे फक्त १० खासदार निवडून आले होते.
१९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि काँग्रेसच्या मतांमध्ये विभाजन होऊ लागले. १९९९, २००४ आणि २००९च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडी अथवा युतीला एकतर्फी कौल मिळाला नाही. १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या खासदारांचे संख्याबळ जास्त होते. पण युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जागा आणि मतांच्या टक्केवारीत फारसे अंतर नव्हते. २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे २७ तर शिवसेना-भाजप युतीचे २१ खासदार निवडून आले होते.
२०१४ मध्ये मात्र भाजप- शिवसेना- स्वाभिमानी शेतकरी संघटना युतीला एकतर्फी कौल मिळाला होता. युतीचे ४२ खासदार निवडून आले होते. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला ४३ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर मोदी लाटेत युतीला एकतर्फी यश मिळाले.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न लक्षात घेऊन राज्यातील मतदार मतदान करतो, असे निरीक्षण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागे नोंदविले होते. इंदिरा किंवा मोदी लाटेत विरोधकांना निभाव लागला नव्हता. तसेच मधल्या काळात भाजप- शिवसेनेच्या विरोधातील वातावरणात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीला यश मिळाले होते याकडे पवारांनी लक्ष वेधले होते.