|| वसंत मुंडे

लोकसभा निवडणूक बीड मतदारसंघात मात्र थेट जातीवरच येऊन ठेपली आहे. मतांच्या गणिताची मांडणीही जातवारच केली जात आहे. त्यामुळे छोटय़ा जातसमूहामध्ये  अस्वस्थता पसरली असून मतांचे ध्रुवीकरण करण्यात कोण यशस्वी होतो, यावरच बीडचे चित्र स्पष्ट होणार आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून दिलेला उमेदवार हा तुलनेने कमी संख्या असलेल्या जातीतील असल्याचा इतिहास आहे. सुरुवातीला साताऱ्याहून आलेले क्रांती सिंह नाना पाटील यांना विजयी केले, तर आष्टीचे रखमाजी गावडे, केशरबाई क्षीरसागर, कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे या नेत्यांना मतदारांनी साथ दिली. मागील दोन्ही निवडणुकीत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध मराठा समाजाच्या नेत्यांनी निवडणूक लढवूनही मोठय़ा फरकाने मुंडे विजयी झाले होते.

बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे, वंचित आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांच्यासह ३६ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र सरळ लढत आहे ती मुंडे आणि सोनवणे यांच्यात. राष्ट्रवादीकडून यावेळीही सामान्य मराठा ‘शेतकरी पुत्र’,  ‘आपला माणूस’ अशी साद घालत जातीच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यासह अनेक मराठा नेत्यांना आमदार, पदाधिकारी केल्याचा दावा करत जातीचे अस्त्र बोथट करण्यावर भर दिला आहे.

उमेदवारांची बलस्थाने

डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) – दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा. बहीण पंकजा मुंडे मंत्री, सहा आमदारांसह बहुतांशी सहकारी संस्थांवर वर्चस्व. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, बचत गट, स्वच्छतागृहांची कामे, गावपातळीवर ग्रामपंचायतींना मोठय़ा प्रमाणात निधी. वंजारी समाजाचे एकगठ्ठा मतदान आणि इतर ओबीसी समूह पाठीशी.

बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) – शेतकरी कुटुंबात जन्म. स्वकर्तृत्वावर व्यवसाय आणि खाजगी साखर कारखान्याची उभारणी. जिल्हा परिषदेत स्वत आणि पत्नी दोघेही सदस्य. आरक्षणाच्या मुद्यामुळे सरकारवरील नाराज मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजाची साथ मिळण्याची आशा. सातत्याने लोकांमध्ये संपर्क.

राजकीय गणित : २० लाख २५ हजार मतदारांत सर्वसाधारणपणे मराठा सात लाख, त्यानंतर वंजारी चार लाख, मुस्लीम अडीच लाख, दलित दोन लाख, धनगर आणि माळी दीड लाख आणि इतर तीन लाख अशी मतदार संख्या असल्याचा दावा वेगवेगळ्या घटकांकडून केला जातो. त्यामुळे राष्ट्रवादीकडून मराठा, दलित आणि मुस्लीम याबरोबरच आरक्षणाच्या मुद्यावरून धनगर आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना भाजपने त्रास दिल्याचे सांगत माळी समाजाची काही मते मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपकडे वंजारी, धनगर, माळी, ब्राह्मण, मारवाडी व इतर छोटय़ा जातींची एकगठ्ठा मते मानली जातात.

जयदत्त क्षीरसागर आणि मेटे यांच्या भूमिका बदलल्या : राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि शिवसंग्रमा संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या बदलत्या भूमिका या ही बीड मतदारसंघात महत्त्वाच्या ठरणार आहेत. जयदत्तअण्णा हे राष्ट्रवादीच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत.भाजपने पार दुर्लक्ष केल्याने मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला तर अन्यत्र भाजपला पाठिंबा जाहीर केला. यावर यायचे तर बरोबर या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांना खडसावले.