|| एजाज हुसेन मुजावर
पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपने पकड बसविली आहे. मागील २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी शिंदे तयारी करीत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. सोलापूरची निवडणूक ही पूर्णत: जातीय वळणावर गेली असून, जातीय समीकरणावरच तिन्ही उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
भाजपने लिंगायत धर्मगुरू डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना निवडणूक मैदानात उतरवून शिंदे यांच्यासमोर अडचणी निर्माण केल्या असतानाच शेवटच्या क्षणी अकोल्याबरोबर सोलापुरातूनही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे सोलापूरचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे एकाच वेळी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान पेलताना शिंदे यांच्यासाठी यंदाची ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली आहे. गेल्या ४०-४५ वर्षांपासून सोलापुरातून लोकप्रतिनिधित्व करीत सत्ताकारणात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळूनदेखील एकांडा शिलेदार ठरलेल्या शिंदे यांना लोकसभा लढतीत समोर नवख्या असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत आपण ४० वर्षांत केलेल्या विकासकामांची यादी जाहीर करीत प्रचार करावा लागत आहे. कारण यंदाच्या निवडणुकीतही शिंदे यांनी सोलापूरसाठी काय केले, या प्रश्नाचा धुरळा उडविला जात आहे.
सोलापुरातील लिंगायत समाजाची संख्या लक्षणीय असून हा समाज अलीकडे काही वर्षे भाजपच्या पाठीशी उभा आहे. म्हणूनच भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्याना उमेदवारी देताना लिंगायतांची पारंपरिक एकगठ्ठा मते याबरोबरच हिंदुत्ववादी विचाराची भुरळ पडलेला नवमतदार वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन समाजाला सत्तेचा वाटा मिळायला हवा म्हणून आग्रही भूमिका घेत प्रकाश आंबेडकर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारी दाखल करताना त्यांनी केलेले जोरदार शक्तिप्रदर्शन आणि त्यांनी अलीकडेच स्वत:बरोबर एमआयएमचे नेते असादोद्दीन ओवैसी यांच्या सोबत घेतलेल्या जाहीर सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. नवबौद्ध समाज आज तरी आंबेडकरांच्या पाठीशी एकवटताना दिसतो. एमआयएमच्या मदतीने मुस्लीम मते तसेच इतर मागासवर्गीय समाजाची मते वळविण्याचा प्रयत्न जर यशस्वी झाला, तर शिंदे यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वाटते.
उमेदवारांची आकडेमोड
प्राप्त परिस्थितीत सुमारे अडीच लाख मतदार असलेला मुस्लीमवर्ग काँग्रेस की वंचित बहुजन आघाडी, अशा दोलायमान स्थितीत दिसतो. १८ लाख ५० हजार मतदारांमध्ये लिंगायत- ३.५० लाख, पद्मशाली- ३ लाख, दलित- ३ लाख, मराठा व मुस्लीम प्रत्येकी अडीच लाख, धनगर- २ लाख व इतर- २ लाख अशी ढोबळ स्वरूपाची जातनिहाय मते आहेत. यात दोघा समाजात क्रिया-प्रतिक्रिया उमटण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर शहरी व ग्रामीण भागातील वातावरण पाहता शहरात जसे मोदींवर प्रेम करणारा नवमतदार दिसतो. तसा ग्रामीण भागात मोदींवर नाराज झालेला वर्गही आढळून येतो. प्राप्त परिस्थितीत सुशीलकुमार शिंदे, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि प्रकाश आंबेडकर या तिन्ही तुल्यबळ उमेदवारांना विजयासाठीची मदार जातीय समीकरणावर ठेवावी लागत आहे.