दिल्लीत भाजप कार्यालयासमोर केलेली निदर्शने व त्यानंतर झालेल्या हाणामाऱ्या आम आदमी पक्षाला महागात पडल्या आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत आचारसंहिता भंगाचा बडगा दाखवत आम आदमी पक्षाला नोटीस पाठवली आहे. आज, शुक्रवारी दुपापर्यंत नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश ‘आप’ला देण्यात आले आहेत.
‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना गुजरातमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ बुधवारी आपचे नेते आशुतोष व शाजिया इल्मी यांच्यासह ५० कार्यकर्त्यांनी भाजपच्या येथील कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आप व भाजपच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. भाजपने यासंदर्भात बुधवारीच तातडीने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेऊन आपविरोधात तक्रार दाखल केली. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा निवडणूक अधिकारी अमेय अभ्यंकर यांनी गुरुवारी आपला नोटीस बजावली.

केजरीवालांची दिलगिरी
आपल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाबद्दल अरविंद केजरीवाल यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी अहिंसेच्या मार्गाने निदर्शने करणे अपेक्षित असून दिल्लीत झालेला प्रकार पक्षाच्या तत्त्वात बसण्यासारखा नसल्याचे केजरीवाल म्हणाले.

कारणे दाखवा
आपने आचारसंहिता भंग केला आहे. आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी सभा, निदर्शनांसाठी स्थानिक पोलिसांची परवागनी घेणे बंधनकारक आहे. परंतु आपने पूर्वसूचना न घेता आम आदमी पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी निदर्शने केलीत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला. आचारसंहिता नियमानुसार एखाद्याच्या निवासस्थानासमोर शांततेने निदर्शने करता येतात. परंतु आपने शांतताभंग केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये.