नवी दिल्ली : भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर, काँग्रेसनेही चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. पक्षाच्या मुख्यालयात सोमवारी मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यासह अन्य नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर, ‘काँग्रेस १५० जागा जिंकेल’, असा दावा पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

त्यावर, काँग्रेसने कितीही स्वप्न पाहिले तरी भाजपला २०० जागा मिळतील, असे प्रत्युत्तर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिले. भाजपच्या मुख्यालयात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित झालेल्या बैठकीत शिवराजसिंह चव्हाण हेही उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशी सूचना मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार व काही राज्यातील मंत्रिमंडळाच्या फेररचनेबद्दलही चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांमध्ये पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या नेतृत्व बदलाची चर्चा होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर शिवराजसिंह चव्हाण यांनी सातत्याने टाळले आहे. काँग्रेसने मात्र प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. राजस्थानमधील अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील वाद मिटवण्यासाठी कमलनाथ यांना खरगेंनी मध्यस्थी करण्यास सांगितले होते. त्यावरून काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा कमलनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने कर्नाटकमध्ये यशस्वीपणे निवडणूक लढली होती, तशीच मध्य प्रदेशामध्ये लढली जाईल. कर्नाटकमध्ये २२४ पैकी १३६ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. मध्य प्रदेशमध्ये २३० जागांपैकी १५० जागा जिंकू. – राहुल गांधी, काँग्रेसचे नेते.

Story img Loader