हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथे निवडणुकीच्या कामासाठी गावात मुक्कामी असलेल्या एका कर्मचाऱ्याने १७ एप्रिलच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत जेवणाच्या कारणावरून ग्रामस्थांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. जेवण साधे का आणले, दारू व कोंबडय़ाची भाजीची व्यवस्था का केली नाही, असे म्हणत त्याने ग्रामस्थांना शिवीगाळ केली. या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र गोरेगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी मध्यस्थी केली. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या बूथवर बदली केली. त्या जागेवर दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्यानंतर तणाव निवाळला. त्यानंतर सव्वानऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जाणार असल्याची माहिती सरपंच श्रीमती भिसे यांनी दिली.