देशभरात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली असतानाच १६व्या लोकसभेसाठीच्या मतदानाचा पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांमधील व्यक्तिकेंद्रित संघर्षांने भाजप आणि काँग्रेससाठी अनेक अंगांनी निर्णायक ठरणार असलेल्या लोकसभा निवडणुकीची नांदी आज होत आहे. आसामातील पाच आणि पश्चिम त्रिपुरातील एक, अशा सहा मतदारसंघात पहिल्या टप्प्याचे मतदानास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक ९ टप्प्यांमध्ये होत असून १२ मे या दिवशी शेवटचा टप्पा आहे. त्यानंतर १६ मे यादिवशी मतमोजणी होणार आहे.
आसामातील तेजपूर, कालियाबोर, जोरहाट, दिब्रुगढ आणि लखिमपूर या पाच तर त्रिपुरातील पश्चिम त्रिपुरा मतदारसंघात आज मतदान होत आहे. यंदा प्रथमच निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे फर्मान एकाही दहशतवादी गटाने सोडलेले नाही.
आसामात काँग्रेसची सत्ता असून तेथे काँग्रेस, भाजप, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्षासह आसाम गण परिषद व अन्य स्थानिक पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पाच जागांसाठी ५१ उमेदवार असून त्यात केंद्रीय मंत्री राणी नाराह आणि पबन सिंह घटोवार, माजी केंद्रीय मत्री आणि विद्यमान आमदार बिजय कृष्ण हांदिक, मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव काँग्रेसतर्फे लढत आहे.
पश्चिम त्रिपुरा मतदारसंघात १३ उमेदवार उभे आहेत. त्यात कम्युनिस्ट पक्षाचे शंकर प्रसाद दत्त, काँग्रेसचे अरुणोदय साहा, भाजपचे सुधींद्र दासगुप्ता आणि तृणमूलतर्फे रतन चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा