Elephants कोलोराडोच्या प्राणी संग्रहालयातील पाच वृ्द्ध अफ्रिकन हत्ती हे त्याच प्राणी संग्रहालयात वास्तव्य करतील. हत्तींना सुटकेची मागणी करण्याचा कोणताही कायदेशीर अदिकार नाही असं राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निर्णयानुसार जांबो, किम्बा, लूलू, लकी आणि मिसी हे पाच हत्यी कोलोरॅडोच्या चेयेन माऊंटन याच प्राणीसंग्रहालयात राहतील. २०२२ मध्ये न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयाने कोर्ट ऑफ अपील्सनेही असाच एक निर्णय दिला होता. ज्यामध्ये हे नमूद करण्यात आलं की हॅपी नावाच्या वृद्ध हत्तीला शहरातील ब्रॉक्स या प्राणी संग्रहालयातच रहावं लागेल. त्याचप्रमाणे हा निर्णय आहे.
नॉन ह्युमन राईट्स प्रोजेक्टने ही दोन प्रकरणं आणली समोर
नॉन ह्युमन राईट्स प्रोजेक्ट या प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने हत्तींसंदर्भातली ही दोन प्रकरणं प्रकाशात आणली. हेबियस कॉर्पस नावाच्या कायदेशीर सिद्धातांच्या दरम्यान ही प्रकरणं कोर्टात नेण्यात आली. प्राणी शास्त्र आणि जीव शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या सात तज्ज्ञांच्या मते या संस्थेने कोर्टाला हे सांगितलं की हत्तींना मानवाप्रमाणे भावना असतात. प्राणी संग्रहालयात बंदिस्त असताना त्यांना बंदी म्हणून आयुष्य जगण्याचा कंटाळा येऊ शकतो, परिणामी त्यांच्या मेंदूला इजा पोहचू शकते, त्यामुळे त्यांची सुटका केली जावी अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने याला नकार दिला आहे.
न्यायमूर्तींनी या प्रकरणाबाबत काय म्हटलं आहे?
कोलोरॅडोचा कायदा माणसांना लागू होतो, प्राण्यांना नाही. मानसिकदृष्ट्या हत्तींच्या भाव-भावना या मानवाप्रमाणे असतीलही. पण ते प्राणी आहेत माणूस नाहीत. त्यामुळे हत्ती हे काही माणसाप्रमाणे मुक्त होऊ शकत नाहीत. न्यायमूर्ती मारिया बर्केनकोटर म्हणाल्या हत्ती हे काही माणूस नाहीत. त्यामुळे त्यांना बंदी बनवण्याचा हेबियस कॉर्पस या प्रकरणांत लागू होत नाही. त्यामुळे हत्तींना मुक्त करण्याचा काही प्रश्नच येत नाही. रॉयटर्सने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
या निकालाबाबत संग्रहालयाने काय म्हटलं आहे?
दरम्यान न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत नॉनह्युमन राईट्स या संस्थेने नाराजी दर्शवली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे पाच हत्तींवर अन्याय झाला आहे. त्यांना आता बंदी म्हणून राहण्याचा मानसिक आणि शारिरीक त्रास आयुष्यभर सहन करावा लागणार आहे. दरम्यान प्राणी संग्रहालयाने या निकालाचं स्वागत केलं आहे. मात्र या एका छोट्याश्या प्रकरणासाठी १९ महिन्यांचा कालावधी म्हणजे बराच वेळ गेल्याचंही म्हटलं आहे. हत्तींच्या या छोट्याशा प्रकरणाला न्यायालयात उत्तर देण्यासाठी आम्ही आमचा मौल्यवान वेळ आणि पैसा वाया घालवला असं प्राणी संग्रहालयाने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.