Elon Musk Child: टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. मस्क यांनी दावा केला की, त्यांनी त्यांच्या बाळाची आई असल्याचा दावा करणाऱ्या अ‍ॅशले सेंट क्लेअर या तरुणीला तिच्या कथित बाल पालन पोषणासाठी २.५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २० कोटी रुपये) दिले आहेत. याचबरोबर मस्क यांनी एक्स पोस्टमध्ये सांगितले की, ते दरवर्षी सेंट क्लेअरला ५००,००० डॉलर्स (सुमारे ४ कोटी रुपये) स्वतंत्रपणे पाठवत आहेत. दरम्यान, मस्क यांनी हे बाळ त्यांचे आहे की नाही याबाबत त्यांना खात्री नसल्याचेही म्हटले आहे.

केव्हा झाली वादाची सुरुवात?

फेब्रुवारी २०२५ मध्ये २६ वर्षीय अ‍ॅशले सेंट क्लेअरने दावा केला की, तिने सप्टेंबर २०२४ मध्ये मस्क यांच्यापासून एका मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. सेंट क्लेअरने एक्स वर जाहीर केले की, सुरुवातीला तिला तिच्या मुलाची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्यासाठी ही बातमी सार्वजनिक करायची नव्हती, परंतु टॅब्लॉइड मीडियाच्या दबावामुळे तिला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. यानंतर, तिने न्यू यॉर्क सर्वोच्च न्यायालयात मस्कविरुद्ध दावा दाखल केला, ज्यामध्ये मुलाचा ताबा आणि पितृत्व चाचणीची मागणी करण्यात आली होती.

एलॉन मक्स यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

एलॉन मस्क यांनी सोमवार, ३१ मार्च रोजी या प्रकरणावर पहिल्यांदच सार्वजनिकपणे स्पष्टीकरण दिले. X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “मला माहित नाही की बाळ माझे आहे की नाही. पण ते बाळ कोणाचे आहे हे शोधण्याच्या विरोधात मी नाही. इथे न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता नाही. काहीही माहित नसतानाही, मी अ‍ॅशलेला २.५ दशलक्ष डॉलर्स दिले आहेत आणि तिला दरवर्षी ५००,००० अमेरिकन डॉलर्स पाठवत आहे.”

दरम्यान अ‍ॅशले सेंट क्लेअरने एलॉन मस्क यांनी तिच्या बाल पालनपोषणाच्या निधीत ६०% कपात केल्याचा दावा केला आहे. यामुळे तिला तिची टेस्ला विकावी लागली, असेही क्लेअरने म्हटले आहे. तिच्या या दाव्यानंतर एलॉन मस्क यांनी या प्रकरणावर पहिल्यांदा भाष्य केले.

कोण आहे अ‍ॅशले सेंट क्लेअर?

अ‍ॅशले सेंट क्लेअरने ‘एलिफंट्स आर नॉट बर्ड्स’ हे पुस्तक लिहिले असून, यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. या पुस्तकातून तिने रूढीवादी दृष्टिकोन मांडले आहेत. याचबरोबर ती बॅबिलोन बी या व्यंगचित्र संकेतस्थळासाठी देखील लेखन करते. याचबरोबर उजव्या विचारसरणीकडे कल असलेली अ‍ॅशले सेंट क्लेअर सतत विविध विषयांवर आक्रमकपणे व्यक्त होत असते.