Elon Musk backs UK MP for English Only : टेस्ला या कार कंपनीचे सीईओ एलॉन मस्क हे नेहमी चर्चेत राहाणारं व्यक्तिमत्व आहे. सोशल मीडियावर मस्क सतत काहीतरी पोस्ट करत असतात. यावेळी मस्क यांनी एका ब्रिटीश खासदाराच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. या खासदाराने लंडन येथील एका रेल्वे स्टेशनचे नाव फक्त आणि फक्त इंग्रजीत असावे अशी पोस्ट केली होती. या रेल्वे स्टेशनचं नाव बंगाली भाषेतही देण्यात आलं आहे. दरम्यान या युकेमधील या खासदाराच्या विधानाला ‘स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे प्रमुख असलेल्या एलॉन मस्क यांनी समर्थन दिले आहे.
लंडनमधील व्हाइटचॅपल रेल्वे स्टेशन (Whitechapel Station) च्या नावाचा बोर्ड इंग्रजी आणि बंगाली अशा दोन भाषेत देण्यात आला आहे. यावर ग्रेट यारमाउथ ( Great Yarmouth) चे खासदार रुपर्ट लोवे (Rupert Lowe) यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली होती. त्यांनी या स्टेशनच्या बोर्डचा फोटो एक्सवर शेअर केला. याबरोबरच रुपर्ट म्हणाले की, “हे लंडन आहे- स्टेशनचे नाव फक्त आणि फक्त इंग्रजीमध्ये असायला हवे.” त्यांच्या या विधानानंतर वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली आहे. ब्रिटनच्या खासदाराच्या ही पोस्ट ताबडतोब सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागल्याचे पाहायला मिळाले. या पोस्टवर एलॉन मस्क यांनी देखील व्यक्त होत फक्त “हो” (Yes) इतकीच प्रतिक्रिया दिली आहे.
लंडनमध्ये फक्त इंग्रजीतच बोर्ड असायला हवेत या मागणीला काही लोक योग्य ठरवत आहेत. तर काही जणांनी असं झालं तर जपान किंवा चीनमधील एखाद्या शहरात गेल्यानंतर प्रवाशांचं काय होईल? असा प्रश्न उपस्थित करत दोन भाषांमध्ये बोर्ड असण्याचं समर्थन केले आहे. एकंदरीत लोवे यांच्या पोस्टवर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही वापरकर्तांनी खासदाराच्या म्हणण्याला पाठिंबा दर्शवला आहे तर काही जणांना दोन भाषेत बोर्ड असावेत असं म्हटलं आहे.
बंगाली पाटी कधी आणि का बसवण्यात आली ?
व्हाइटचॅपलच्या ट्यूब स्टेशनवर ही बंगाली भाषेतील बोर्ड २०२२ साली बसवण्यात आला होता. पूर्व लंडनमध्ये बांगलादेशी समुदायाने दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ हा बोर्ड बसवण्यात आला होता. टॉवर हॅमलेट्स कौन्सिलने व्हाईटचॅपल स्टेशनवर दोन भाषेतील बोर्ड लावण्यासाठी निधी दिला होता. या भागात यूकेमधील मोठ्या संख्येने बांगलादेशी समुदाय वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले होते.