जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मागील बऱ्याच काळापासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या एलॉन मस्क यांनी हे स्थान गमावलं आहे. ट्विटरचे नवे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या एलॉन मस्क यांना लुईस व्हुइटनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रेनार्ड अरनॉल्ट यांनी मागे टाकलं आहे. फोर्ब्समधील यादीनुसार लुईस यांची संपत्ती १८५.८ बिलियन डॉलर्स इतकी आहे. मस्क यांच्या संपत्तीपेक्षा ही संपत्ती ४०० मिलियन डॉलर्सने अधिक आहे.
श्रीमंतांच्या यादीमध्ये मस्क पिछाडीवर पडण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांनी ट्विटरसाठी बरीच मोठी रक्कम खर्च केली. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मस्क यांनी ४४ बिलियन डॉलर्सचा ट्वीटरचा ताबा घेतला. या खरेदीमुळे मस्क यांची संपत्ती २०० बिलियन डॉलर्सने कमी झाली.
टेस्लाच्या शेअरहोल्डर्सच्या दाव्यानुसार मस्क यांनी ट्विटरवर लक्ष केंद्रीत केल्याने टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली. याचा फटका कंपनीच्या बाजार मुल्याला बसला. याच पडझडीचा परिणाम असाही झाला की सीईओ असलेल्या मस्क यांनीच २० मिलियन शेअर्स विकले. ४ बिलियन डॉलर्सला मस्क यांनी हा सौदा केला.
मस्क यांच्या संपत्तीचे मुख्य स्त्रोत या त्यांच्या कंपन्या आहेत. यामध्ये टेस्ला, ट्विटर, स्पेसएक्स, न्यूरालिंक आणि ‘द बोरिंग कंपनी’सारख्या कंपन्यांचा सहभाग आहे. मस्क यांची पहिल्या क्रमांकावरुन घसरण झाल्यानंतर काही तासामध्येच त्यांनी पुन्हा पहिलं स्थान मिळवलं. दिवसभरातील बाजारपेठेमधील व्यवहारांच्या आधारे संपत्तीनुसार श्रीमंताच्या यादीमधील स्थान निश्चित होत असल्याने दिवस संपेपर्यंत मस्क पुन्हा पहिल्या स्थानी होते.