Elon Musk on X Down Worldwide : एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर जगभरातील असंख्य युजर्सना काल (१० मार्च) दिवसभरात दोन वेळा आउटेजचा सामना करावा लागला. आउटेज-ट्रॅकिंग वेबसाइटवर युजर्सनी दाखल केलेल्या तक्रारींच्या डेटावरून असं दिसून आलं आहे की काल दिवसभर जगभरात लाखो युजर्सना एक्सचा वापर करण्यात अडथळे येत होते. आजही एक्सवरील अनेक फंक्शन्स बंद आहेत. दरम्यान, एक्स प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर मस्क यांनी एक्सवर एक पोस्ट करून या घटनेवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “एक्सवर एक मोठा सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे आमचा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सतत डाऊन होतोय. एक्सवर रोज सायबर हल्ले होत असून आमची टीम देखील त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहेत.”
एलॉन मस्क म्हणाले, “आमची टीम या सायबर हल्ल्यांचा प्रतिकार करत असली तरी सोमवारी मोठ्या ताकदिनीशी सायबर हल्लेखोरांनी आमच्या सिस्टिमवर हल्ला केला. यामागे एखादी मोठी गुन्हेगारी संघटना किंवा एखाद्या देशाचा हात असू शकतो.”
सोमवारी जगभऱात एक्स डाऊन होतं
यापूर्वी सोमवारी दुपारी जगभरातील लाखो एक्स युजर्सना अॅप व एक्सचं संकेतस्थळ वापरण्यास समस्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. युजर्सना मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटीच्या समस्येचा सामना करावा लागला होता. जगभरातील अशा वेबसाइट्स व त्यांच्या अॅप्सवर लक्ष ठेवणाऱ्या डाउन डिटेक्टर या वेबसाइटनुसार, सोमवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास एक्सवर व्यत्यय आल्याबद्दलच्या असंख्य तक्रारी नोंदल्या गेल्या होत्या. डाउनडिटेक्टरच्या मते, भारतात सुमारे २०००, अमेरिकेत १८,००० आणि युकेमध्ये १०,००० लोकांनी ही समस्या नोंदवली.
डाउनडिटेक्टर यूएसच्या अहवालानुसार अमेरिकेत ५७% युजर्सना एक्स वापरण्यात समस्या येत होत्या, ३४% युजर्सनी वेबसाइटमध्ये समस्या असल्याचं म्हटले तर ९% युजर्सनी सर्व्हर समस्या असल्याच्या तक्रारी नोंदवल्या. युकेमध्ये, ६१% युजर्सना अॅपबद्दल, ३४% युजर्सनी वेबसाइटबद्दल आणि ५% युजर्सना सर्व्हर समस्यांचा सामना करावा लागला.

युजर्सचा त्रागा
एक्स डाउन झाल्याच्या समस्येबद्दल इतर सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर बोलताना, एका व्यक्तीने म्हटले की, “तुम्हा सर्वांचे X/Twitter बंद आहे का? मला हा प्लॅटफॉर्म आवडत नाही.” यानंतर फेसबुकवर दुसरा एक युजर म्हणाला की, “मला वाटते एक्स बंद आहे, याबाबत दुसरीकडे कुठे पोस्ट करू शकत नसल्याने मी इथे आलो आहे.”