भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मानवरहित गगनयान डिसेंबरमध्ये अवकाशात झेपावणार आहे. मानवी अवकाश मोहिमेची पूर्वतयारी करोना टाळेबंदीमुळे मागे पडत चालली होती, त्याला आता गती देण्यात येत आहे. गगनयान मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा बुधवारी यशस्वीरित्या पार पाडला. इस्रोने विकास इंजिनच्या तिसऱ्या लांब पल्ल्यासाठीचं तापमान परीक्षण केलं. गगनयान मोहीमेसाठी या इंजिनाचा वापर केला जाणार आहे. या यशस्वी परीक्षणानंतर एलन मस्क यांनी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. इस्रोने या परीक्षणाबाबत ट्वीटरवर माहिती दिली होती. त्यानंतर त्यावर एलन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तामिळनाडुतील महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्पलेक्समध्ये ही चाचणी करण्यात आली. विकास इंजिन २४० सेकंद चालवण्यात आलं. यावेळी इंजिन व्यवस्थित काम करत असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं. इस्रो गगनयानच्या माध्यमातून माणसाला अंतराळात घेऊन जाणं, तसेच तिथून परत आणण्यासाठी काम करत आहे. “इस्रोने १४ जुलैला विकास इंजिनाची तापमान चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. मानव आधारित जीएसएलव्ही एमके ३ मिसाईलवर कोर एल ११० लिक्विड स्टेजवर परीक्षण करण्यात आलं.” असं ट्वीट इस्रोनं केलं होतं. त्यावर एलन मस्क यांनी ‘शुभेच्छा’ असं ट्वीट केलं आहे. त्यासोबत भारताचा झेंडाही जोडला आहे.
#ISRO on July 14, 2021 has successfully conducted the hot test of the liquid propellant Vikas Engine for the core L110 liquid stage of the human rated GSLV MkIII vehicle, as part of engine qualification requirements for the #Gaganyaan Programme
Read More: https://t.co/cqYatVNwsf pic.twitter.com/4MFvHIBgVW
— ISRO (@isro) July 14, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या मोहिमेची घोषणा केली होती. मानवी अवकाश मोहीम भारताच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी अगोदर म्हणजे १५ ऑगस्ट २०२२ अगोदर व्हावी असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. इस्रोतील वैज्ञानिक व तंत्रज्ञ जास्त काम करून लक्ष्य गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. गगनयानची काही कामे पूर्ण झाली असून गेले दशकभर या योजनेवर काम चालूच होते, फक्त त्याची घोषणा तीन वर्षांंपूर्वी करण्यात आली. इस्रो या मोहिमेत फ्रान्स, रशिया, अमेरिका यांच्या अवकाश संस्थांची मदत घेत असून काही घटक हे देश पुरवणार आहेत.