Donald Trump Vs Elon Musk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून एआय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटची घोषणा केल्यानंतर काही वेळातच, एलॉन मस्क यांनी त्यांच्या या घोषणेची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत डेटा सेंटर आणि एआय इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी ‘स्टारगेट’ची स्थापना करण्याची घोषणा केली. सॉफ्टबँक, ओपनएआय, ओरॅकल आणि एमजीएक्स या कंपन्या या प्रकल्पाच्या गुंतवणूकदार आहेत. त्यांचा हा ५०० अब्ज डॉलर्सचा संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पाचे तंत्रज्ञान भागीदार आर्म होल्डिंग्ज, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीडिया आहेत आणि ‘स्टारगेट’ने याचे काम सुरू करण्यासाठी १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या घोषणेवेळी डोनाल्ड ट्रम्प, सॅम ऑल्टमन, सॉफ्टबँकचे सीईओ मासायोशी सन आणि ओरॅकलचे सीटीओ लॅरी एलिसन उपस्थित होते.

एलॉन मस्क यांनी उडवली खिल्ली

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर ओपन एआयने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून याबाबत माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय एलॉन मस्क यांनी या घोषणेची खिल्ली उडवत, “त्यांच्याकडे प्रत्यक्षात पैसेच नाहीत”, अशी पोस्ट एक्सवर केली आहे. आणखी एका पोस्टमध्ये मस्क यांनी स्टारगेट प्रकल्पातील कंपनी, “सॉफ्टबँककडे १० अब्ज डॉलर्सपेक्षा कमी रक्कम आहे”, असे म्हटले आहे.

आशा आहे की, तुम्ही अमेरिकेला प्राधान्य द्याल…

दरम्यान एलॉन मस्क यांच्या या आरोपाला ओपन एआयचे संस्थापक सॅम अल्टमन यांनी लगेचच उत्तर दिले. ते म्हणाले, “तुम्हाला नक्कीच माहिती असेल की, हे चुकीचे आहे. या प्रकल्पाचा कामाला आधीच सुरुवात झाली आहे. तुम्हाला पहिल्या साइटला भेट द्यायची आहे का? ही देशासाठी उत्तम गोष्ट आहे. मला माहित आहे की, देशासाठी जे चांगले आहे ते नेहमीच तुमच्या कंपन्यांसाठी चांगले असेल असे नाही. परंतु, तुमच्या नव्या भूमिकेमुळे मला आशा आहे की, तुम्ही अमेरिकेला प्राधान्य द्याल.”

ट्रम्प-मस्क यांच्यातील जवळीक

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवत दमदार पुनरागमन केले आहे. या निवडणुकीच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात मोठी जवळीक निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांच्यासाठी मस्क यांनी जोरदार प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते. एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या विजयासाठी फक्त प्रचारच केला नाव्हता, तर त्यांच्या विजयासाठी मस्क यांनी २२०० कोटी रुपयेही खर्च केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk donald trump sam altman openai stargate ai project 500 million dollars aam