Elon Musk on Twitter Logo Changed : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेत ट्विटरचा लोगो बदलला. या निर्णयानुसार प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी आता ट्विटरवर श्वानाचा लोगो वापरण्यात आला आहे. या बदलानंतर एलॉन मस्क यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी वचन दिल्याप्रमाणे निर्णय घेतल्याचं म्हटलं.
या निर्णयानंतर एलॉन मस्क यांनी एक मीम शेअर केलं. यात श्वान कारच्या चालकाच्या जागेवर बसलेलं आहे आणि ते वाहतूक पोलिसांना आपलं ओळखपत्र दाखवत आहे. या ओळखपत्रात निळ्या चिमणीचा फोटो आहे. त्यावर हे श्वान वाहतूक पोलिसांना हा आपला जुना फोटो असल्याचं सांगत आहे.
“वचन दिल्याप्रमाणे…”
आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये एलॉन मस्क यांनी “वचन दिल्याप्रमाणे…” असं कॅप्शन देत त्यांच्या जुन्या ट्वीट्सचा स्क्रिनशॉट शेअर केला. यात त्यांचं एक जुनं ट्वीट दिसत आहे. त्यात त्यांनी एका नव्या प्लॅटफॉर्मची गरज आहे का? असं विचारलं आहे. यावर चेअरमन नावाच्या ट्विटर हँडलवरून वापरकर्त्याने मस्क यांना ट्विटर विकत घ्या आणि ट्विटरचा लोगो पक्ष्याऐवजी श्वानाचा ठेवा असं म्हटलं. यावर मस्क यांनी हसत योग्य ठरणार नाही म्हटलं होतं. मात्र, आता तोच स्क्रिनशॉट शेअर करत त्यांनी आपण आपलं वचन पूर्ण केल्याचं म्हटलं.
दरम्यान, ट्विटरच्या लोगोत बदल झाल्यानंतर अनेकांना आधी ट्विटर हॅक झाले की काय असं वाटलं. मात्र, नंतर स्वतः एलॉन मस्क यांनीच ट्विट करत माहिती दिल्याने हा संभ्रम संपला आणि ट्विटरचा लोगो बदलण्यात आल्यावर शिक्कामोर्तब झालं.
हेही वाचा : Twitter Logo : एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय, ट्विटरचा लोगो बदलला, नवा लोगो कोणता? पाहा…
नेमका काय बदल?
![Elon-Musk-change-Twitter-Logo-31](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/04/Elon-Musk-change-Twitter-Logo-31.jpg?w=830)
एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता जेथे जेथे निळी चिमणी दिसत होती तिथं तिथं श्वानाचा लोगो दिसत आहे. ट्विटर पेज रिफ्रेश केल्यानंतरही सुरुवातीला हाच श्वानाचा लोगो दिसतो आणि मग होम पेज ओपन होते. ट्विटरच्या साईटवर डावीकडे सर्वात वरच्या बाजूला हा निळ्या चिमणीच्या जागी श्वानाचा लोगो दिसत आहे.