रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी युक्रेनला मदतीचा हात देत स्टारलिंक इंटरनेट सेवा पुरवली. मात्र, आता याच स्टारलिंक इंटरनेट सेवेवर सायबर हल्ले होत असल्याचं समोर आलंय. स्वतः एलन मस्क यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. यात त्यांनी आत्तापर्यंत स्टारलिंक इंटरनेट सिस्टिम हॅक करण्यासाठी सायबर हल्ले झाल्याचे आणि ते परतवून लावल्याची माहिती दिली.
एलन मस्क आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “स्टारलिंकने आतापर्यंत झालेल्या हॅकिंग आणि जॅमिंगच्या प्रयत्नांना रोखलं आहे.” दरम्यान, याआधी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने मागील महिन्यात स्टारलिंकचे सॅटेलाईट मोडेम हॅक झाल्याचं वृत्त दिलं होतं. यानंतर एलन मस्क यांची ही प्रतिक्रिया समोर आलीय. या वृत्तात स्टारलिंक सॅटेलाईट मोडेम हॅक करण्यामागे रशियन सैन्याची गुप्तहेर संस्था जीआरयू (GRU) असल्याचाही आरोप करण्यात आला होता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी देखील रशियाकडून सायबर हल्ले होऊ शकतात असा इशारा यापूर्वीच दिला होता.
“संवाद यंत्रणा उद्ध्वस्त करून युक्रेनच्या सैन्याचा संपर्क तोडण्याचा प्रयत्न”
सध्या रशियन सॅटेलाईटशिवाय केवळ स्टारलिंक सॅटेलाईट एकमेव इंटरनेट सेवा आहे जी युद्धजन्य युक्रेनमध्ये सुरू आहे. त्यामुळे रशियाकडून ही शेवटची संवाद यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा आणि युक्रेनच्या सैन्याचा संपर्क तोडण्याचा प्रयत्न आहे.
“अगदी गरज असेल तेव्हाच स्टारलिंक इंटरनेट वापरण्याचा मस्क यांचा सल्ला”
या पार्श्वभूमीवर एलन मस्क यांनी युक्रेनच्या नागरिकांना अगदी गरज असेल तेव्हाच स्टारलिंक सेवा वापरण्याचा सल्ला दिला आहे. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केल्यानंतर एलन मस्क यांनी युक्रेनला स्टारलिंकची इंटरनेट सेवा वापरता येईल असे अँटेना पुरवले आहेत. हे अँटेना दुरवरून दिसणार नाही याचीही काळजी घेण्याची सूचना मस्क यांनी दिली आहे.
युक्रेनसाठी स्टारलिंक इंटरनेट सेवा महत्त्वाची का?
रशियाने युक्रेनला नमवण्यासाठी केवळ जमिनीवरील सैन्य कारवाईच केलेली नाही, तर युक्रेनची संवाद यंत्रणा उद्ध्वस्त करून चारही बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. याचाच भाग म्हणून रशियाकडून युक्रेनच्या इंटरनेट सेवा आणि ब्रॉडबँड सेवा देणाऱ्या यंत्रणा देखील उद्ध्वस्त केल्या जात आहेत. त्यामुळे युक्रेनचा उर्वरित जगाशी संपर्कच तुटून जाईल आणि युक्रेनला कोणतीही मदत मिळणार नाही, असा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळेच युक्रेनच्या उप पंतप्रधानांनी थेट एलोन मस्क यांना मदतीची विनवणी केली होती.
हेही वाचा : “युक्रेननं आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत घ्यायला हवी होती, कारण…”; झेलेन्स्कींचा उल्लेख करत फडणवीसांचं वक्तव्य
स्टारलिंक काय आहे?
स्टारलिंक स्पेसएक्सच्या २,००० हून अधिक उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारं अंतराळातील स्टेशन आहे. संपूर्ण पृथ्वीवर इंटरनेट सेवा पुरवणे हा या स्टेशनचा उद्देश आहे.